12th Vasai-Virar Marathon: पश्चिम रेल्वे 8 डिसेंबर रोजी वसई-विरार मॅरेथॉनच्या सहभागींसाठी चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा

सहभागी मॅरेथॉनच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यासाठी पहाटेच्या वेळी या गाड्या धावतील.

Mumbai Local| X

यंदा 8 डिसेंबर 2024 रोजी 12 वी वसई-विरार मॅरेथॉन (Vasai-Virar Marathon) पार पडणार आहे. हा कार्यक्रम 2011 मध्ये राज्यस्तरीय इव्हेंट म्हणून सुरू झाला आणि व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारच्या भारतीय ऍथलीट्ससाठी सर्वाधिक बक्षीस रक्कम ऑफर करून, आता तो देशाच्या प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेपैकी एक बनला आहे. याआधी 2022 मध्ये मॅरेथॉनच्या 10 व्या आवृत्तीत सुमारे 21000 धावपटूंनी भाग घेतला होता. आता वसई-विरार मॅरेथॉनच्या 12 व्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या सहभागींच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे.

पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, ते चर्चगेट ते विरारपर्यंत रविवार, 8 डिसेंबर 2024 रोजी दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवणार आहेत. सहभागी मॅरेथॉनच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यासाठी पहाटेच्या वेळी या गाड्या धावतील. वसई-विरार मॅरेथॉनमध्ये विविध शर्यती आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या विशेष गाड्या त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सोयीच्या ठरू शकतील. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत, शहर हलवले धुक्यात)

गाड्यांच्या वेळा-

चर्चगेटवरून पहिली विशेष गाडी 8 डिसेंबर रोजी सकाळी 2.30 वाजता सुटेल. त्यानंतर दुसरी गाडी 3 वाजता सुटेल. या दोन्ही गाड्या विरार येथे अनुक्रमे 4 वाजून 5 मिनिटांनी आणि 4 वाजून 35 मिनिटांनी पोहोचतील.

मॅरेथॉन स्पर्धा-

पूर्ण मॅरेथॉन:

पूर्ण मॅरेथॉन (42.195 किमी) व्हिवा कॉलेज (विरार, पश्चिम) पासून सुरू होते आणि व्हिवा कॉलेजमध्ये समाप्त होते. सर्व पूर्ण मॅरेथॉन सहभागींसाठी विरार रेल्वे स्थानकावरून मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध आहे.

हाफ मॅरेथॉन:

हाफ मॅरेथॉन (21.097 किमी) वसई तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरून सुरू होते आणि वसई कोर्ट, वसई गाव व्हिवा कॉलेज येथे संपेल. वसई रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेरून स्टार्ट पॉइंटपर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध आहे.

ओपन रन:

ओपन रन (11 किमी आणि 5 किमी) व्हिवा कॉलेज (विरार पश्चिम) पासून सुरू होते आणि व्हिवा कॉलेजमध्ये समाप्त होते.

दरम्यान, प्रवाशांची लोकप्रियता आणि वाढती मागणी पाहता, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरी विभागात एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने मंगळवारी मुंबई लोकल ट्रेनचे अपडेट्स शेअर करताना सांगितले की, 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी लोकल ट्रेन सेवा सुरू केल्या जाणार आहेत. या सेवांची सेवेची भर पडल्याने एसी लोकल सेवांची एकूण संख्या 96 वरून 109 होईल आणि शनिवार आणि रविवारी 52 वरून 65 पर्यंत वाढेल.