10 वी मराठीचा पेपर फुटला नाही, परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे वृत्त चुकीचे; शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

पहिल्याच दिवशी 10 वीचा पेपर फुटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

राज्यात आजपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक नाशिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 10 वीचा पेपर फुटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हाकाकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. मात्र हे वृत्त पूर्णतः चुकीचे असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, यांनी दिली.

पहिल्या दिवशीचा मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. मात्र त्यात तथ्यता नसल्याचे समोर आले आहे.

हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ताबडतोब अधिकाऱ्यांकडुन या घटनेची माहिती घेण्यात आली. ही गोष्ट गंभीर असल्याने याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. आता विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे इ. 10 वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे सांगण्यात आले आहे. सोबत मंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिध्द करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. (हेही वाचा: Maharashtra SSC Exam 2020: आजपासून राज्यात 10 वी च्या परीक्षेला सुरुवात; 4979 परीक्षा केंद्र सज्ज)

शिक्षण विभाग दरवर्षी कॉपीमुक्त अभियान राबवत असते. मात्र आज या पेपरफुटीच्या वृत्तामुळे या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.