अवैध पार्किंग करणा-यांस आता भरावा लागणार 10,000 रुपयांचा भुर्दंड
पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील 'नो पार्किंग झोन'मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग करणा-यांवर दहा हजार रुपये दंड ठोठावणार आहे.
मुंबईतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशावेळी रस्त्यावर किंवा रस्त्यालगत वाहनांची हमखास पार्किंग केली जाते. मात्र लोकांच्या अशा ने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे महापालिकेने याची गंभीर घेत पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील 'नो पार्किंग झोन'मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग करणा-यांवर दहा हजार रुपये दंड ठोठावणार आहे.
तसेच दंड न भरल्यास संबंधित वाहन 'टोइंग मशीन'द्वारे उचलून नेले जाणार आहे. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईत रेल्वे स्टेशन किंवा मोक्याच्या ठिकाणी पे अँड पार्कचा सेवा वाहनधारकांसाठी दिलेली आहे. मात्र लोक सर्रासपणे ही सेवा झिडकारुन अगदी निर्धास्तपणे रस्त्यांवर गाड्या पार्क करतात. त्यामुळे अशा बेशिस्त आणि मुजोर वाहनधारकांना चांगला चोप बसावा यासाठी महापालिकेने ही नवीन योजना अंमलात आणली आहे.
तसेच पार्किंगलगतचा एक किलोमीटरचा रस्ता व दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सर्व परिमंडळाच्या उपायुक्तांना दिले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा- कार चालकांसाठी आनंदाची बातमी; 'या' कारसाठी टोल आणि पार्किंग माफ, केंद्र सरकारचा निर्णय
मुंबईतील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र अवैध पार्किंगचे वाढते प्रकार लक्षात घेता याच प्रयत्नांचा भाग म्हणून ही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिलीय.