‘Chalo Mantralaya’ Protest: मुंबईमधील बेस्ट कामगार संघटनेने केली 15 जानेवारीला 'चलो मंत्रालय' आंदोलनाची घोषणा; जाणून घ्या काय आहेत मागण्या

बेस्ट सध्या अंदाजे 2,900 बसेसचा ताफा चालवते, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत, ज्यातून दररोज 35 लाख प्रवाशांची सेवा केली जाते.

BEST Bus (File Image)

‘Chalo Mantralaya’ Protest: मुंबईमधील बेस्ट वर्कर्स युनियन (BEST Workers Union) 15 जानेवारी 2025 रोजी ‘चलो मंत्रालय’ मोर्चा काढणार आहे. युनियनने सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या भवितव्याशी संबंधित त्यांच्या मागण्यांसाठी, हा व्यापक निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, सोमवारी, नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बेस्टच्या आधुनिकीकरणाची योजना सुरू आहे, आणि सार्वजनिक वाहतूक नेटवर्कमध्ये लवकरच 1,300 नवीन इलेक्ट्रिक बस (ई-बस) जोडल्या जातील.

युनियन बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या खालावलेल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहे, तसेच वादग्रस्त ‘वेट लीज सिस्टीम’ रद्द करण्याची आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना अधिक चांगले समर्थन देण्याचे आवाहन करत आहे. बेस्ट सध्या अंदाजे 2,900 बसेसचा ताफा चालवते, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत, ज्यातून दररोज 35 लाख प्रवाशांची सेवा केली जाते.

बेस्ट वर्कर्स युनियनच्या प्रमुख मागण्या-

बेस्टने म्हटले आहे, बेस्ट वर्कर्स युनियन बेस्टचे अस्तित्व धोक्यात आहे.

बेस्ट उपक्रमाने प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरमार्फत भाडेतत्वाने बस घेण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करावी.

दिनांक 11 जून, 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन करून, बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीचा 3,337 बसगाड्यांचा बसताफा राखण्यासाठी, म्हणजेच आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी, आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा.

मुंबईकर जनतेला अल्पदरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देण्याकरिता लागणाऱ्या बसगाड्या बेस्टच्या स्वमालकीच्याच असाव्यात व त्या बसगाड्या बेस्ट उपक्रमानेच चालवाव्यात. (हेही वाचा: School Trip Bus Driver Found Drunk: मुंबई मध्ये अंधेरी परिसरामद्ये बस चालक, वाहक आढळले मद्यधुंद अवस्थेत; ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला)

युनियन नेत्यांची भीती-

अशाप्रकारे, या मागण्यांकडे मा. मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी व सर्व मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, ‘चलो मंत्रालय’ या मोर्चा बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता काढण्यात येणार आहे. युनियन नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘वेट लीज सिस्टीम’ सार्वजनिक वाहतुकीची गुणवत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा कमी करते. त्यांना भीती वाटत आहे की, खाजगी कंत्राटदारांवर सतत अवलंबून राहिल्याने भविष्यात विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक पुरवठादार म्हणून बेस्टची भूमिका कमी होऊ शकते.