Vaccine Tourism: मुंबईच्या ट्रॅव्हल एजन्सीचे खास पॅकेज, अमेरिकेच्या 4 दिवसांच्या ट्रीपमध्ये COVID-19 Vaccine समाविष्ट; जाणून घ्या काय आहे 'लस पर्यटन'
अशा परिस्थितीत, लसविषयी लोकांची उत्सुकताही वाढत आहे.
जगातील बर्याच देशांमध्ये कोरोना विषाणू लसची (Coronavirus Vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे आणि आता या लसीच्या वितरणाची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत, लसविषयी लोकांची उत्सुकताही वाढत आहे. दरम्यान, मुंबईस्थित (Mumbai) एका ट्रॅव्हल एजन्सीने (Travel Agency) सोमवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली जी व्हायरल झाली. कंपनीने या टूर पॅकेजमध्ये एक दावा केला होता, ज्यात अमेरिकेत कोविड लस देण्याचा समावेश आहे. परंतु जेव्हा या जाहिरातीवर चर्चा सुरू झाली आणि वाद झाला तेव्हा कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईस्थित एका कंपनीने अशी ऑफर आणली आहे की, लोक अमेरिकेत फिरायला जाऊ शकतील व तिथेच 4 दिवस राहून लस देखील घेऊ शकतील. कंपनीचा हा 1.75 लाख रुपयांच्या पॅकेजचा मेसेज अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. कंपनीने याला 'व्हॅक्सीन टूरिझम' असे नाव दिले आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये तुम्हाला मुंबई ते न्यूयॉर्क व न्यूयॉर्क ते मुंबई असे तीन दिवस आणि चार रात्रीचे पॅकेज मिळेल. यामध्ये एअरफेअर, हॉटेलमध्ये मुक्काम, ब्रेकफास्ट आणि लसीचा डोस समाविष्ट आहे.
अमेरिकेत अधिकृतपणे फायजर लस विक्रीसाठी उपलब्ध होताच (संभाव्य तारीख - 11 डिसेंबर), कंपनी तिथे काही निवडक व्हीव्हीआयपी ग्राहकांना ही लस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणार आहे. जेव्हा या जाहिरीतीबाबत वाद सुरू झाला, तेव्हा कंपनीने स्पष्ट केले की, आता फक्त नोंदणी केली जात आहे व लसीचा डोस देण्याची तारीख निश्चित केलेली नाही. नंतर, कंपनीने आपल्या नवीन जाहिरातीमध्ये अमेरिकेतील लसी वितरण प्रक्रियेची माहिती दिली, ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. तसेच शेवटी, हॉस्पिटल्समध्ये डोस विक्रीसाठी उपलब्ध असतील असेही म्हटले आहे. (हेही वाचा: रशियाची Sputnik V लस ठरली 95 टक्के प्रभावी; जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार वितरण, जाणून घ्या किंमत)
सध्या या पॅकेजसाठी कोणाकडूनही पैसे घेतले जात नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) ही गेल्या काही वर्षांत अतिशय लोकप्रिय टर्म बनली आहे. यामध्ये प्रवासी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परदेशात जातात. आता पर्यटन तज्ञांचे मत आहे की 2021 मध्ये ‘लस पर्यटन’ (Vaccine Tourism) हा सर्वात मोठा ट्रेंड होईल. लस पर्यटन म्हणजे अशा देशातील प्रवास असेल, जिथे कोविड-19 लस प्रथम विकसित केली गेली असेल आणि ती प्रभावी ठरली असेल. याद्वारे ज्या लोकांना आपल्या देशात लस मिळू शकत नाही असे लोक इतर देशात जाऊन लस घेऊ शकतात.