Restaurant-On-Wheel: मुंबईच्या CSMT येथे सुरु झाले शहरातील पहिले रेस्टॉरंट-ऑन-व्हील; जाणून घ्या काय असेल खास
त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अगदी सुरत या स्थानकांमध्येही रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुरू करण्याचा विचार चालू आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे मुंबईचे (Mumbai) पहिले रेस्टॉरंट-ऑन-व्हील (Restaurant-On-Wheel) 18 ऑक्टोबर रोजी जनतेसाठी खुले होणार आहे. ट्रेन कोच-टर्न-रेस्टॉरंट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हेरिटेज गल्लीजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या प्रवेशद्वारावर आहे. या भोजनालयात एका वेळी 40 लोक जेवण करतील इतकी क्षमता आहे. फ्रीप्रेस जर्नलच्या अहवालानुसार, रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉन-व्हेज असा दोन्ही प्रकारचा मेनू देण्यात येईल. डाइन-इन व्यतिरिक्त, मिनी कॅफे आणि ज्यूससाठी टेकवे विंडो देखील असणार आहे.
अशाप्रकारे रेल्वेने एक जुन्या डब्ब्याचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करून मुंबईकरांना शाही भोजनाचा आस्वाद देण्याची योजना आखली आहे. एकदा रेस्टॉरंट कार्यान्वित झाल्यावर, लोकांना ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप्सद्वारे जेवण मागवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. रेस्टॉरंटमध्ये रेल्वे-थीमसह मुंबईच्या इतर महत्वाच्या खुणा दर्शवल्या गेल्या आहेत. रेस्टॉरंटची इतर उपनगरांशी सहज कनेक्टिव्हिटी असून, या ठिकाणी पुरेशी पार्किंग जागा देखील असेल. अहवालानुसार, हे रेस्टॉरंट लोकांसाठी खुले झाल्यानंतर अधिकारी मुंबई दर्शन सहलींमध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करतील.
या रेस्टॉरंटमध्ये दोन विभाग असून, एका ठिकाणी तुम्ही बसून जेवू शकता तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला उभे राहून वडा पाव, समोसा, ज्यूस अशा पदार्थांचा आस्वाद घेता येईल. डब्याचा मुळात असलेला निळा रंग काढून त्याची उत्तम रीतीने रंगरंगोटी केली गेली आहे, त्यामुळे ग्राहकांना एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटचा अनुभव घेता येणार आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती कंत्राटदाराने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निश्चित केल्या आहेत. जेवणासाठीचे फर्निचर हे साइटवर तयार केले गेले आहे. रेस्टॉरंटमध्ये सुरक्षित अंतर लक्षात घेऊन सर्व व्यवस्था केली गेली आहे. (हेही वाचा: Mumbai Colleges Reopen: 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालयं होणार सुरु; मुंबई विद्यापीठाने जारी केल्या SOP's)
लवकरच अशा प्रकारचे भोजनालय कुर्ला एलटीटी, ठाणे आणि कल्याण सारख्या इतर ठिकाणीही सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अगदी सुरत या स्थानकांमध्येही रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुरू करण्याचा विचार चालू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या भोजनालयाच्या कंत्राटदाराकडून वार्षिक 42 लाख रुपयांची अपेक्षा आहे.