Matheran Toy Train: प्रवाशांसाठी खुशखबर! 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार लोकप्रिय माथेरान-नेरळ टॉय ट्रेनची सेवा; जाणून घ्या वेळापत्रक

21 किलोमीटर लांबीचा नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रॅक मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिल स्टेशनच्या नयनरम्य घाटातून जातो.

Matheran Toy Train. (Photo Credit: X@PiyushGoyal)

माथेरान (Matheran) हे मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. इथली टॉय ट्रेन (Matheran Toy Train) लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता नेरळ ते माथेरान दरम्यान चालणारी ही टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. माथेरानची आयकॉनिक मिनी ट्रेन 4 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी रुळावर येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने गुरुवारी केली.

याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करताना, मध्य रेल्वेने सांगितले की, नेरळहून माथेरानसाठी सकाळी 8.50 आणि 10.50 वाजता दोन डाऊन सेवा आणि माथेरान ते नेरळसाठी दुपारी 2.45 आणि 4 वाजता दोन अप सेवा चालवल्या जातील. सर्व चार सेवा एकूण सहा डब्यांसह चालवल्या जातील.

या गाड्यांमध्ये तीन द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम आणि दोन द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनचे डबे असतील. यासह अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यानच्या शटल सेवांची वेळदेखील 4 नोव्हेंबरपासून सुधारित केली जाईल, असे रेल्वेने सांगितले. मध्य रेल्वे अमन लॉज आणि माथेरान दरम्यान डाउन आणि अप दिशेने प्रत्येकी सहा सेवा चालवते, तर आठवड्याच्या शेवटी प्रत्येकी आठ सेवा दोन दिशांना चालवतात. माथेरानहून पहिली शटल सेवा सकाळी 8.20 वाजता सुरु होईल. आणि अमन लॉजवरून माथेरानसाठीची शेवटची शटल सेवा 5.45 वाजता असेल.

सर्व शटल सेवा तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणी कोच आणि दोन द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील, असे प्रकाशनात म्हटले आहे. मध्य रेल्वे दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या पावसाळ्यात नेरळ ते माथेरान दरम्यान टॉय ट्रेनचे संचालन थांबवते. मात्र माथेरान ते अमन लॉज दरम्यान रेल्वे सेवा सुरु असतात. हे दस्तुरी पॉईंटपासून जवळचे स्टेशन आहे. त्याच्या पलीकडे हिल स्टेशनमध्ये वाहनांना परवानगी नाही. (हेही वाचा: Thailand Waives Visas for Indians: भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर! आता थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, नेरळ-माथेरान रेल्वे सेवा 100 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि ती भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. 21 किलोमीटर लांबीचा नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रॅक मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिल स्टेशनच्या नयनरम्य घाटातून जातो.