Mahabaleshwar Tourism Festival 2025: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन; जाणून घ्या काय असेल खास

पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Mahabaleshwar Tourism Festival 2025: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन; जाणून घ्या काय असेल खास
Mahabaleshwar (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे (Mahabaleshwar Tourism Festival 2025) आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे 2 मे 2025 रोजी उद्घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटनस्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे.

पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे 4,500 फूट उंचीवर वसलेले गिरीस्थान आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची महाबळेश्वर पूर्वी ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतींची आठवण करुन देतात. या ठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. (हेही वाचा: Ropeways at Maharashtra’s Top Tourist Spots: महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी खुशखबर! आता माथेरान, अलिबाग, एलिफंटा गुहा, जेजुरीसह 45 ठिकाणी रोपवेचा आनंद घेता येणार(

पर्यटकांसाठी  पर्यटन महोत्सव कालावधीत विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असून येथे 50 निवासी टेंट पर्यटक आणि मान्यवरांसाठी उपलब्ध होणार आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभव समृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2025 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).