Kaas Plateau Tourism Ban: कास पठार पर्यटकांसाठी यंदा खुले नाही, कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम

ऑगस्ट महिना उजाडला की कास पठारावरील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक दाखल होत असतात. गेली कित्येक वर्षे पर्यटक आणि कास पठार हे नाते दृढ होत गेले आहे. परंतू कोरना व्हायरस संकट आले आणि सगळे चित्रच बदलून गेले.

Kaas Plateau Beauty | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यासह देशभरातील असंख्य पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग असलेले कास पठार (Kaas Plateau) यांदा पर्यटकांसाठी खुले असणार नाही. कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण लक्षात घेता राज्यातील धार्मिक स्थळं तसेच पर्यटन स्थळंही बंद आहेत. या पार्श्वभूमीवर कास पठारावर जाण्यासही वन विभागाने बंदी (Kaas Plateau Ban) घातली आहे. खरे तर हा काळ म्हणजे कास पठारावर असलेल्या फुलांचा उत्सव (Kaas Plateau Tourism) पाहण्याचा काळ. परंतू कोरोनाने सर्वांवरच मर्यादा घातल्या आहेत. दरम्यान, बंदी असतानाही काही पर्यटक फुलांचा उत्सव बघण्याच्या मोहाने कास पठारावर दाखल होत आहेत. त्यामुळे वन विभागाने अशा पर्यटकांवर कारवाई सुरु केली आहे.

कास पठार हे सातारा जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ आहे. साताऱ्याच्या पश्चिम दिशेला साधारण 22 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या विविधतेने नेटलेले हे पठार पर्यटकांचे मोठे आकर्षण राहिले आहे. या पठारावर असलेल्या कास तलावातूनच सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पठारावर जैवविविधता पाहायला मिळते. ज्यात अनेक दुर्मीळ वनस्पती, झाडे, प्राणी, जीव असा सुरेख संगम पाहायला मिळतो. उल्लेखनीय असे की, युनेस्कोनेही कास पठाराचा जागतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित यादीत 2012 मध्ये समावेश केला आहे. (हेही वाचा, Fact Check: फुलांनी सजलेल्या कास पठाराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या फोटो मागील सत्य)

कास पठारांवर फुललेला फुलांचा उत्सव पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक वर्षभर वाट पाहात असतात. ऑगस्ट महिना उजाडला की कास पठारावरील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक दाखल होत असतात. गेली कित्येक वर्षे पर्यटक आणि कास पठार हे नाते दृढ होत गेले आहे. परंतू कोरना व्हायरस संकट आले आणि सगळे चित्रच बदलून गेले. कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारची लस, औषध उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग पाळणे हाच एकमेवर उपाय जगभरातील अनेक तज्ज्ञ सूचवत आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होईल अशी स्थळं काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कास पठारावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी असणार आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कास पठारावार येण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांना तसे अवाहनही केले आहे. दरम्यान, कास पठारावार येण्यासाठी बंदी असल्याची माहिती देणारे फलकही सध्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. प्रामुख्याने सातारा ते कास पठार या दरम्यानच्या रस्त्यांवर हे फलक मोठ्या प्रमाणावर दिसतात. तसेच, बंदी असतानाही जर पर्यटकांनी कास पठारावर प्रवेश केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेश देण्यात आले आहेत.