Jail Tourism: महाराष्ट्रातील तुरुंग पर्यटनासाठी खुले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'येरवडा जेल' पासून सुरुवात
येरवडा तुरुंग जवळपास दीडशे वर्ष जुना आहे आणि हा भारतातील सर्वात महत्वाचा तुरूंग आहे. अनेक महत्वाच्या घटना, नेते या तुरूंगाच्या इतिहासाचा भाग आहेत. या तुरुंगाच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आपला स्वातंत्र्यलढा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल
महाराष्ट्रात ‘कारागृह पर्यटन’ (Jail Tourism) ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या पर्यटनाचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील 150 वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) करण्यात येणार आहे. प्रक्षेपण कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार येरवडा कारागृहात उपस्थित होते. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे, रत्नागिरी या इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कारागृहातदेखील ही संकल्पना राबविली जाणर आहे.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘आपल्याकडे पूर्वी जेल भरो आंदोलन असायचे, आता ‘जेल यात्रा’ हा नवीन प्रकार येईल. त्याला मी ‘जेल फिरो’ असे म्हणेन. आता हा नवीन प्रकार आहे, लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतानाच जेलमध्ये जाऊन आलो, असे सांगतील. पण जेलमध्ये जाऊन येतो, म्हणजे गुन्हा करण्याची गरज नाही. आपण ‘जेलयात्रा’ हा पर्यटनाचा एक नवीन मार्ग दाखवला आहे.’ यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येरवडा तुरुंगातील दिवसांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. क्रांतीकारक चाफेकर बंधू यांचा तुरुंगवास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.
भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘कारागृह पर्यटन’ ही वेगळी संकल्पना आहे. (हेही वाचा: Maharashtra Tourism: राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी 2,905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार; तब्बल 6,754 रोजगाराची निर्मिती होणार)
येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्यसैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा ‘पुणे करार’ येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. जनतेला हा इतिहास समजावा, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले आहे.
‘येरवडा तुरुंग जवळपास दीडशे वर्ष जुना आहे आणि हा भारतातील सर्वात महत्वाचा तुरूंग आहे. अनेक महत्वाच्या घटना, नेते या तुरूंगाच्या इतिहासाचा भाग आहेत. या तुरुंगाच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आपला स्वातंत्र्यलढा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल,’ असे मत सुनील रामानंद, एडीजी जेल, महाराष्ट्र यांनी व्यक्त केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)