Indore-Bhopal Vande Bharat Train आता नागपूर पर्यंत धावणार; रेल्वे मंत्रालयाची माहिती
पाच मिनिटांचा थांबा देऊन ही गाडी नागपूरकडे रवाना होईल.
इंदौर-भोपाळ दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन (Indore-Bhopal Vande Bharat Train) आता नागपूर (Nagpur) पर्यंत चालवली जाणार आहे. आज 10 ऑक्टोबर पासून हा बदल करण्यात आला असून त्याचा फायदा महाराष्ट्रातील नागरिकांनाही मिळणार आहे. वंदे भारतचं याबाबतचं नवं वेळापत्रक आता रेल्वे कडून जारी करण्यात आलं आहे.
इंदौर येथून सकाळी 6.10 वाजता सुटून ही ट्रेन 9.15 वाजता भोपाळला पोहोचेल. पाच मिनिटांचा थांबा देऊन ही गाडी नागपूरकडे रवाना होईल. इटारसी मार्गे सकाळी 10.45 वाजता निघून नागपूरला दुपारी 2.50 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासामध्ये ती नागपूरहून दुपारी 3.20 वाजता निघून इटारसीला 7 वाजता, भोपाळला 8.40 वाजता, उज्जैनला 10.50 वाजता आणि इंदूरला रात्री 11.45 वाजता पोहोचेल. नवीन वेळेनुसार ही गाडी मंगळवार 10 ऑक्टोबरपासून धावणार आहे.
इंदूर व्यतिरिक्त भोपाळलाही वंदे भारत ट्रेनचा नागपूरपर्यंत विस्तार केल्यास फायदा होईल असं सांगण्यात आले आहे. भोपाळहूनही शेकडो प्रवाशांना कमी वेळेत नागपूरला जाता येणार आहे. नागपूर परिसरातून महाकालच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांनाही सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे.
इंदूर-नागपूर दरम्यान खूप ट्राफिक असते. भोपाळ आणि नागपूर दरम्यानही ट्राफिक आहे. वंदे भारत ट्रेन नागपूरपर्यंत धावल्याने इंदूर, उज्जैन आणि होशंगाबाद आणि नागपूरच्या प्रवाशांना फायदा होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ट्रेनमध्ये जागा मिळताना मारामारी असते. त्यामुळे प्रवाशांना रस्त्याने प्रवास करावा लागला. पण आता वंदे भारत ट्रेनचा एक पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.