नवरात्री, दिवाळी आणि छठ पूजा साठी मध्य रेल्वेकडून 418 विशेष गाड्या, आजपासून तिकीट आरक्षण सुरू
नवरात्री, दिवाळी आणि छठ पूजा या सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४१८ विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली असून, यातील काही गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाले आहे.
गणेशोत्सवानंतर आता आगामी सणासुदीच्या दिवसांचे वेध लागले आहेत. नवरात्री, दिवाळी आणि छठ पूजा या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध मार्गांवर एकूण 418 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यातील काही महत्त्वाच्या गाड्यांच्या आरक्षणाला 28 सप्टेंबर 2026 पासून सुरुवात झाली असून, प्रवासी पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी वेबसाइट आणि रेलवन अॅपच्या माध्यमातून तिकीट आरक्षण करू शकतात.
कोणत्या गाड्यांचे आरक्षण सुरू
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ०२१३९, ०२१४०, ०१४०३, ०१४०४, ०१४५१ आणि ०१४५२ या विशेष गाडी क्रमांकांचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. या गाड्यांच्या माध्यमातून उत्तर भारतातील प्रमुख शहरांशी तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांशी संपर्क सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सीएसएमटी-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूर या मार्गावर एकूण १२ फेऱ्यांची साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सेवा चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०२१३९ ही सीएसएमटीहून दर शनिवारी रात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.३५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही सेवा १७ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सहा फेऱ्यांसाठी उपलब्ध असेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१४० ही नागपूरहून दर रविवारी दुपारी १.३० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ४.१० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही सेवा १८ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या काळात सहा फेऱ्यांसाठी धावेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा असेल.
या गाडीत ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ११ शयनयान डबे आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ द्वितीय श्रेणी डबे यांचा समावेश असेल.
पुणे-अमरावती साप्ताहिक एसी विशेष
पुणे आणि नवीन अमरावती दरम्यान देखील १२ फेऱ्यांची साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी सेवा सुरू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१४०३ ही पुण्याहून दर मंगळवारी रात्री ७.५५ वाजता सुटून पुढील दिवशी सकाळी १०.०५ वाजता नवीन अमरावतीला पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक ०१४०४ ही नवीन अमरावतीहून दर बुधवारी दुपारी १२ वाजता सुटून पुढील दिवशी मध्यरात्री १२.१५ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला दौंड चोर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव यांसह जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि मुर्तिजापूर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाडीत ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ११ शयनयान डबे आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सर्वसाधारण द्वितीय श्रेणी डबे यांचा समावेश असेल.
तिकीट आरक्षणाचे पर्याय
मध्य रेल्वेने प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्रवासी सर्व पीआरएस (प्रवासी आरक्षण केंद्र) स्थानकांवर जाऊन, आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा रेलवन या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे तिकीट आरक्षण करू शकतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने, वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.