Azadi Ka Amrit Mahotsav: 5 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून बुधवारी, लाल किल्ल्यावरून निघालेल्या तिरंगा बाइक रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री आणि तरुण खासदार सदस्यांसह अनेकांनी भाग घेतला.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशभरात 'हर घर तिरंगा' उत्सव सुरू झाला असून तो 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आता केंद्र सरकारने लोकांना स्वातंत्र्याच्या या सणाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये अभ्यागतांसाठी मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे.
ASI च्या स्मारक-2 चे संचालक डॉ. एन.के. पाठक यांच्या वतीने बुधवारी आदेश जारी करण्यात आले आहेत की, 5 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत लोक सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये यांचे विनामूल्य दर्शन घेऊ शकतील. या ठिकाणी भेटीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.
यामध्ये आग्राचा ताजमहाल, फतेहपूर सिक्री, सिकंदरा आणि इतर स्मारकांचा समावेश आहे. देशात ASI द्वारे संरक्षित सुमारे 3700 स्मारके आहेत. सम्राट शाहजहाँचा उर्स, जागतिक वारसा दिन, जागतिक पर्यटन दिन आणि जागतिक महिला दिन या दिवशी ताजमहाल विनामूल्य पाहता येतो. जागतिक वारसा दिन आणि जागतिक महिला दिनी इतर स्मारके विनामूल्य पाहता येतात. श्रावणच्या तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी अकबराची समाधी देखील विनामूल्य पाहता येते. (हेही वाचा: देशात आजपर्यतच्या सर्वाधिक UPI व्यवहारांची नोंद,पंतप्रधान मोदींकडून भारतीयांचे अभिनंदन)
दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून बुधवारी, लाल किल्ल्यावरून निघालेल्या तिरंगा बाइक रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री आणि तरुण खासदार सदस्यांसह अनेकांनी भाग घेतला. देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरही तसेच मंत्री स्म्रिती इराणीदेखील सहभागी झाले होते.