New Year 2019 : गोंदिया आणि मुंबई या शहरात 2019 च्या पहिल्या सूर्योदयाचे फोटो क्लिक करा आणि MTDC कडून खास बक्षीस जिंका!
महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर सुमारे 27 मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो.
New Year 2019: येत्या काही तासातच आपण 2019 या नव्या वर्षाचं स्वागत करणार आहोत. अनेकांचे न्यू इयर प्लॅन्स तयार असतील पण फोटोग्राफी तुमची आवड असेल आणि तुमचा काहीच प्लॅन नसेल तर सरकारने तुम्हांला नव्या वर्षाची परफेक्ट सुरूवात टिपण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’ (Swagat Pahilya Suryakirnanche) हा खास उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया (Gondia) जिल्ह्यात तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये (Mumbai) होतो. या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाची (Sun Rise) छायाचित्रे टिपून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी मिळणार आहे.
गोंदिया आणि मुंबई शहराची निवड का ?
गोंदिया हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तर मुंबई हा सर्वात पश्चिमेकडील जिल्हा आहे. गोंदियाला महाराष्ट्राचा ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर सुमारे 27 मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो.
कुठे पाठवाल फोटो? काय मिळणार बक्षीस
पहिल्या 3 उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याची सोय करण्यात येईल. निवडक छायचित्रांना शासनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच एमटीडीसीच्या देशविदेशात नेण्यात येणाऱ्या प्रसिद्धी सामग्रीत या छायाचित्रांचा समावेश होणार आहे. वेबसाईट, सोशल मीडिया पेजेस यावर ही निवडक छायाचित्रे छायाचित्रकाराच्या नावासह प्रसिद्ध करण्यात येतील. छायाचित्रे dgiprsocialmedia@gmail.com या ईमेलवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे 994 किलोमीटर इतके अंतर आहे. पृथ्वीला परिवलनाद्वारे हे अंतर पार करण्यास साधारण 27 मिनिटे लागतात. मुंबईमध्ये 1 जानेवारी 2019 सूर्योदयाची वेळ 07:11 तर गोंदियामध्ये 1 जानेवारी 2019 सूर्योदयाची वेळ 06:46 आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)