Winter Skin Care Tips : आला हिवाळा, असे सांभाळा त्वचेला
चला तर पाहूया थंडीमध्ये कशी घ्यावी त्वचेची काळजी.
Winter Skin Care Tips : थंडी सुरु झाली आहे, या मोसमात गुलाबी थंडीत अंगावर रजई घेऊन लोळत पडण्याची मजा काही औरच. बाहेर पडताना मफलर, स्वेटर आणि स्कार्फमुळे मिळणारी ऊब सर्वांनाच हवीहवीसी वाटते. मात्र या काळात सर्वात जास्त समस्या उद्भवतात त्या आपल्या त्वचेच्या. हवामानाचा, वातावरणाचा त्वचेवर सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच, पण हिवाळ्यात तर ती विशेषत्वाने घ्यावी लागते. थंडामध्ये त्वचेमधील आद्रता कमी होऊन त्वचा शुष्क होते. थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्यानेसुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. म्हणूनच हिवाळ्यामध्येसुद्धा जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चला तर पाहूया थंडीमध्ये कशी घ्यावी त्वचेची काळजी.
> सर्वात महत्वाचे म्हणजे हिवाळ्यातील त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरातील आद्रता टिकून राहते.
> सकाळी उठल्याबरोबर चेहरा कोमट (गरम नाही) पाण्याचे स्वच्छ धुवा. अंघोळीसाठी साबणापेक्षा शक्यतो लिक्विड सोपचा वापर करावा. त्यानंतर येतो तो तुमचा फेस वॉश आणि मॉइश्चराइजर. रात्री झोपताना आणि सकाळी बाहेर पडताना मॉइश्चराइजर लावणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेचा पोत कोणता आहे हे पाहून फेस वॉश आणि मॉइश्चराइजरची निवड करावी. याचसोबत तुम्ही ग्लिसरीन व कोल्ड क्रिमचाही वापर करू शकता.
> आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करू शकता.
> हिवाळ्यात नाही म्हटले तरी उन्हाचाही परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, त्यासाठी सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
> थंडीमध्ये चेहरा नितळ राहावा यासाठी वेळोवेळी फेशिअल करा, यामुळे त्वचेला पोषण मिळेल. हिवाळ्यात मेकअप करण्याचे प्रमाण कमी करा. मात्र मेक-अप करण्यापूर्वी प्रथम त्वचा योग्य प्रकारे मॉइश्चराइझ करून घ्यावी. त्यानंतर तुम्ही क्रीम बेस मेक-अप करू शकता.
> पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो.
> व्हिनेगर हे त्वचेच्या कोरडेपणासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरडेपणा निघून जाण्यासाठी हाताला व्हिनेगर लावून हात गरम पाण्याने धुवा आणि यामुळे तुमचे हात मुलायम होण्यास मदत होईल.
> लिंबूरस, गुलाबपाणी, आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा दिवसभर त्वचा मऊ राहते.
> खोबरेल तेल, अॅरोमा किंवा तिळाच्या तेलाने मसाज करून आंघोळ करणे हा थंडीमधील त्वचेसाठी उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलेही तेल थोड्या प्रमाणात घालावे, म्हणजे त्वचेचे आपोआप मॉइश्चरायझिंग होते.
> त्वचेसोबत ओठही तितकेच महत्वाचे असतात. ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फुटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा. ओठ जर निस्तेज झाले असतील तर मध आणि साखर यांच्या मिश्रणाने ओठांना स्क्रब करावा.
> थंडीत भूक जास्त लागते. मात्र अरबट चरबट खाण्यापेक्षा काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, गूळ, बेदाणे इत्यादी पदार्थांचे सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावे. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. त्याचप्रमाणे दुग्ध किंवा स्निग्धयुक्त पदार्थांचे सेवन जास्त करावे. दिवसभरात फळे खाण्यावर जास्त भर द्यावा.
> हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरूक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे यासुद्धा तक्रारी आढळतात. अशावेळी तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते.