Republic Day 2021 Live Streaming and Telecast on Doordarshan: 26 जानेवारीला साजरा होणार 72 वा प्रजासत्ताक दिन; दूरदर्शनवर पहा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

या ऐतिहासिक प्रसंगी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिनी परेड आयोजित करण्यात आली आहे. भारत दरवर्षी लोकशाहीचा हा महापर्व भव्य पद्धतीने साजरा करतो, परंतु यावर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजारामुळे या उत्सवामध्ये बरेच बदल पाहायला मिळतील.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits Wikimedia Commons)

भारत यावर्षी आपला 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा करणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिनी परेड आयोजित करण्यात आली आहे. भारत दरवर्षी लोकशाहीचा हा महापर्व भव्य पद्धतीने साजरा करतो, परंतु यावर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजारामुळे या उत्सवामध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. यावेळी परेडमध्ये प्रमुख अतिथी असणार नाहीत. कोरोना साथीच्या आजारामुळे प्रजासत्ताक दिन 2021 साठी परदेशी नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले नाही.

कोरोना साथीच्या आजारामुळे प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये फारच थोड्या लोकांना परेड पाहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी केवळ 25 हजार लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षी सुमारे दीड लाख प्रेक्षक ही परेड पाहण्यासाठी उपस्थित होते. यंदा केवळ 4,000 सामान्य लोकांना परवानगी असेल, उर्वरित प्रेक्षक व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी अतिथी असतील.

परेड करणाऱ्या सैन्य पथकांची संख्या 144 वरून 96 करण्यात आली आहे. याखेरीज प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यांमध्ये एकूण 32 चित्ररथ असतील, त्यापैकी 17 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. यासह नऊ चित्ररथ वेगवेगळ्या मंत्रालयांशी संबंधित असतील, तर सुरक्षा दलांचे 6 चित्ररथ असतील. यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड आणि चित्ररथाचे राष्ट्रपती भवनापासून प्रारंभ होऊन पुढे रस्ता वेगळा असेल. कोरोना साथीच्या आजारामुळे हा बदल झाला आहे. नेहमी लाल किल्ल्यापर्यंत जाणारी परेड या वेळी फक्त नॅशनल स्टेडियमपर्यंत जाईल. पुढे लाल किल्ल्यापर्यंत चित्ररथ जातील.

कोरोना विषाणूशी संबंधित सुरक्षा निकषांमुळे यावर्षीच्या परेड दरम्यान मोटारसायकल स्टंट होणार नाहीत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 18 व्या वेळी 61 'इक्वेस्ट्रियन रेजिमेंट' चा खास घोडा दिसेल. वयाच्या चार वर्षापासून हा घोडा परेडमध्ये भाग घेत आहे. यावेळी बांगलादेशचे पथक परेडमधील विशेष आकर्षणाचे केंद्र असेल, जो 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्राम युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त परेडमध्ये भाग घेत आहे. (हेही वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधत देशवासियांना दिला मोलाचा संदेश, भारतीय सैन्यासह शेतक-यांविषयी व्यक्त केली कृतज्ञता)

दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण - 

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडचे व संपूर्ण सोहळ्याचे दूरदर्शनवर (Doordarshan) थेट प्रसारण होणार आहे. यावेळी परेडचे कव्हरेज अधिक नेत्रदीपक बनविण्यासाठी दूरदर्शनच्या वतीने खास व्यवस्था करण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी, 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भव्य सोहळा भारतातील सांस्कृतिक विविधता आणि सैन्य क्षमता दर्शविण्यासाठी कोविड-19 चा प्रोटोकॉल पाळून आयोजित करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूरदर्शन प्रजासत्ताक दिन परेडचे थेट प्रक्षेपण करत आहे. पुन्हा एकदा दूरदर्शनने राजपथ, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट आणि राष्ट्रीय समर स्मारक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे शौर्य, अभिमान, सांस्कृतिक विविधतेचा उत्सव दर्शवण्यासाठी आपले कॅमेरे सज्ज ठेवले आहेत.