अरेंज मॅरेजची भीती? ठरवून होणाऱ्या लग्नासाठी होकार देण्याआधी या 5 गोष्टींचा विचार नक्की करा
ठरवून होत असलेल्या लग्नापूर्वी तुम्ही या गोष्टींचा विचार केला नाही तर तुमचे लग्न पुढे जाऊन धोक्यात येऊ शकते.
जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश असेल जिथे आजही आपली सभ्यता, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज यांचे पालन केले जाते. याचमुळे भारत सर्वांपासून वेगळा भासतो. भारताच्या अशा संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितले आहेत त्यामध्ये विवाह (Marriage) संस्काराला फार महत्व देण्यात आले आहे. यामुळेच लग्न हे भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक मानला जातो. भारतातील विविध जाती, प्रदेशांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या चालीरीती परंपरा आहेत. आजही भारतात कित्येक ठिकाणी प्रेम विवाहाऐवजी ठरवून केलेल्या लग्नालाच (Arranged Marriage) प्राधान्य दिले जाते. अनेक शिकलेले तरुण आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीचाच बायको म्हणून स्वीकार करतात.
जर का तुम्ही प्रेम विवाह (Love Marriage) करत असाल तर तुम्ही आधीपासूनच तुमच्या जोडीदाराचे बरे-वाईट गुण, सवयी यांबाबत परिचित असता. मात्र जर का तुम्ही तुमचे लग्न ठरवून करत असाल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. ठरवून होत असलेल्या लग्नापूर्वी तुम्ही या गोष्टींचा विचार केला नाही तर तुमचे लग्न पुढे जाऊन धोक्यात येऊ शकते.
- तुमचा भूतकाळ लपवू नका –जर का तुम्ही तुमच्या आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करत असाल तर तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला तुमच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगा. जर का तुमचे आधी कोणते प्रेम संबंध असतील तर अशा गोष्टी न लपवता स्पष्टपणे होणाऱ्या जोडीदारासमोर मांडा. लग्नानंतर काही समस्या उद्भवू नये म्हणून हे करणे गरजेचे आहे.
- घाई करू नका –जरी तुमच्यासाठी मुलगी तुमच्या आईवडिलांनी पसंत केली असेल, तरी लग्न करण्यासाठी तुम्ही घाई करू नका . लग्न ठरल्यानंतर तुमच्या होणाऱ्या जोडीदारासोबत काही काळ व्यतीत करा. त्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
- मनात असेल ते सर्व सांगा –जर का तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर होणाऱ्या जोडीदाराला भेटून तुम्हाला नक्की काय वाटते ते सर्व मनमोकळेपणाने सांगा. भविष्याबद्दल तुमच्या काय कल्पना आहेत, स्वप्ने आहेत याबाबत चर्चा करा. (हेही वाचा: बॉयफ्रेंडसोबत नेहमीच खोटे बोलणाऱ्या गर्लफ्रेंड्स; नात्यात लपवून ठेवल्या जातात 'या' महत्वाच्या गोष्टी)
- आर्थिक जबाबदारीचे भान ठेवा -अरेंज मॅरेज करत असाल तर आपल्या जोडीदाराच्या मिळकतीबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्य रंगवताना आपण कितपत खर्च करू शकतो याचा दोघांनाही अंदाज येईल. दोघांनीही होणाऱ्या खर्चाबद्दल बोला. पैसे कसे, किती आणि कोणत्या प्रकारे मिळवायचे आहेत अथवा खर्च करायचे आहेत याचा दोघांनाही अंदाज येईल.
- कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा –प्रेम विवाहामध्ये बरेचवेळा आई वडिलांना तो मुलगा अथवा ती मुलगी कोण आहे ते माहित असते किंवा मुलगी-मुलाला एकमेकांच्या कुटुंबाबद्दल माहिती असते. मात्र जर का तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर एकमेकांच्या परिवारासोबत नक्की पुरेसा वेळ व्यतीत करा. लग्न हे दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबाला एकत्र आणते त्यामुळे लग्नाआधी कुटुंबाची ओळख असणे गरजेचे आहे.
तर अरेंज मॅरेज करण्याआधी पहिल्यापासूनच या गोष्टींचा विचार केला तर कदाचित तुमचे वैवाहिक जीवन सोपे जाण्यास मदत होऊ शकते. मात्र लक्षात घ्या अरेंज मॅरेजमध्ये जोडीदाराबद्दल जराही किंतु मनात असेल तर वेळ घ्या, स्वतःला वेळ द्या. योग्य विचार करूनच निर्णय घ्या.