International Women's Day 2019: पाच भारतीय ट्रान्सजेंडर महिला ज्यांनी प्रवाहातील महिलांपेक्षाही केली दमदार कामगिरी
अमेरिकेत स्त्रियांनी केलेल्या हक्काच्या लढाई स्मरणार्थ महिला दिन साजरा होतो, मात्र अशा ट्रान्सजेंडर स्त्रियांची लढाई आजही चालू आहे. आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वीकारले जावे म्हणून आंदोलन करण्याची गरज भासत आहे.
समाजात वावरताना स्त्री आणि पुरुष असे दोनच लिंग (Gender)आहेत असा समज बिंबवला जातो. मात्र आजही आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया दिसतात त्यांचे मन स्त्रीचे आहे मात्र शरीर पुरुषाचे. अशा घुसमटलेल्या शरीरात अडकून जीवन जगण्यापेक्षा आपले लिंग बदलण्याचा (Sex Change) पर्याय अनेकांनी स्वीकारला. मात्र अशा लोकांच्या मनात घोंघावणारे वादळ तिथेच उमटते आणि तिथेच विरते. कारण आपला समाज आजही ट्रान्सजेंडर (Transgender) लोकांना स्वीकारू शकला नाही. अमेरिकेत स्त्रियांनी केलेल्या हक्काच्या लढाई स्मरणार्थ महिला दिन साजरा होतो, मात्र अशा ट्रान्सजेंडर स्त्रियांची लढाई आजही चालू आहे. आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वीकारले जावे म्हणून आंदोलन करण्याची गरज भासत आहे. मात्र हु केअर्स? काय फरक पडतो? आम्ही जसे आहोत तसेच राहणार या विचारावर ठाम असलेल्या अनेक ट्रान्सजेंडर स्त्रिया आज समाजामध्ये एक आदर्श बनल्या आहेत. आज या महिला दिनानिमित्त चला पाहूया अशा काही ट्रान्सजेंडर महिला ज्यांनी समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
> लक्ष्मी त्रिपाठी (Laxmi Narayan Tripathi)
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या ट्रान्सजेंडर लोकांमध्ये लक्ष्मी त्रिपाठी हे नाव अग्रगण्य आहे. 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या एशिया पॅसिफिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एकमेव आणि पहिल्या ट्रान्सजेन्डर होत्या. ठाण्यात एका छोटय़ा घरात आई-वडील आणि भावंडांसोबत राहणारा लक्ष्मीनारायण त्रिपाठी हा मुलगा होता. मात्र घुसमटलेल्या मनाला मोकळे करण्यासाठी त्यांनी लिंगपरिवर्तन केले. आज तृतीयपंथी लोकांना जे अधिकार मिळाले आहेत त्यात लक्ष्मी त्रिपाठी यांचे फार मोठे योगदान आहे.
> जॉईता मोंडल (Joyita Mondal)
आज भारतातील पहिली ट्रान्सजेंडर महिला न्यायाधीश म्हणून जॉईता यांचे नाव घेतले जाते. 29 वर्षीय जोयंतो यांचा जन्म कोलकाता शहरात झाला, मात्र नंतर त्यांनी एक तृतीयपंथी म्हणून जगायला सुरुवात केली. भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला, सोबत मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी जुलै 2017 मध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.
> वीणा सेंद्रे (Veena Sendre)
भारताची ट्रान्सक्वीन ब्युटी म्हणून वीणा सेंद्रेचे नाव घेतले जाते. मुळची छत्तीसगडची असलेली वीणा मिस इंटरनॅशनल क्वीन स्पर्धेत सहभागी झाली आहे. एक ट्रान्सजेंडर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ती आज भारताचे प्रतिनिधित्व करत आहे ही गोष्ट खचितच अभिमानाची आहे. मॉडेलींग क्षेत्रात असलेले मुलींचे वर्चस्व मोडीत काढून वीणाने आपली शरीरयष्टी, कांती, चेहरा आणि अदांच्या जोरावर इथवर मजल मारली आहे.
> गजल धालीवाल (Gazal Dhaliwal) -
नुकताच प्रदर्शित झालेला 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची कथा लिहिणारी गजल धालीवाल आज बॉलिवूडमधील चर्चित नाव आहे. गझलने 'लिपस्टिक अंडर माय बुरखा', 'करीब करीब सिंगल', आणि 'बजीर' सारख्या चित्रपटांसाठीही काम केले आहे. लहानपणी गझल गुनराज नावाचा मुलगा होता, मात्र शरीर आणि मन यांमध्ये काही गडबड झाली आहे हे लक्षात येताच गझलने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर कुटुंबाच्या पाठींब्याने ती गुनराजची गझल झाली. आज बॉलीवूडमधील यशस्वी लेखिका म्हणून तिचे नाव घेतले जाते.
> अप्सरा रेड्डी (Apsara Reddy)
नुकतीच काँग्रेसने महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. याधीही काही ट्रान्सजेन्डर महिला राजकारणात सक्रीय होत्या, मात्र इतक्या मोठ्या पदासाठी पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडरची निवड करून कॉंग्रेसने इतिहास निर्माण केला आहे. अप्सरा रेड्डी यांनी ब्रॉडकास्ट जर्नलिझमची पदवी मिळवली आहे. याआधी विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)