Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या लढाया आणि प्रसंग
वयाच्या सतराव्या वर्षी अवघ्या काही मावळ्यांच्या मदतीने त्यांनी तोरणा जिंकला. तलवारीशी झालेले हे लग्न अगदी शेवटपर्यंत टिकले, म्हणूनच त्यांचे अर्धे आयुष्य लढाई करण्यातच गेले. चला पाहूया शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या लढाया आणि प्रसंग
Shiv Jayanti 2019: विचारी, व्यवहारी, लढवय्ये, कर्तव्यदक्ष, धोरणी, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, कुटुंबवत्सल असे कैक गुण लाभलेले शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान. राजा कसा असावा, राज्य कसे सांभाळावे, नीती कशी मांडावी, कुटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी अशा कित्येक गोष्टींची उदाहरणे राजांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. म्हणूनच फक्त महाराष्ट्रातच नाही तर आख्या हिंदुस्तानात त्यांचे नाव राजाधिराज छत्रपती म्हणून दुमदुमत आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. त्याकाळी हिंदुस्तानावर परकीयांची सत्ता होती, प्रजेची होरपळ होत होती. हीच गोष्ट माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या निदर्शनास आणून दिली, आणि ठिणगी पडली ती स्वतंत्र मराठा साम्राज्य उभे करण्याच्या महत्वकांक्षेची. आपल्या प्रजेला सुखी ठेवण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध त्यांची लढाई होती. याला सुरुवात झाली ती 1647 साली, जेव्हा वयाच्या सतराव्या वर्षी अवघ्या काही मावळ्यांच्या मदतीने त्यांनी तोरणा जिंकला. तलवारीशी झालेले हे लग्न अगदी शेवटपर्यंत टिकले, म्हणूनच त्यांचे अर्धे आयुष्य लढाई करण्यातच गेले. चला पाहूया शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या लढाया आणि प्रसंग.
जावळीवर स्वारी – जावळीचे सरदार चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा महत्वाचा व्यक्ती होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी 1656 साली शिवाजी महाराज जावळीवर चालून गेले. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले. यामुळे कोकण भागात उतरण्याचा मार्ग मोकळा होऊन, स्वराज्याचा विस्तार झाला. त्यानंतर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली.
अफझलखान वध – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई म्हणून याकडे पहिले जाते. राजांनी मोठ्या शिताफीने अफजलखानाला प्रतापगडाच्या पायाथ्याशी बोलावले. त्यानंतर झालेल्या झटापटीत महाराजांनी अफजाखानाचा वध केला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो.
कोल्हापूरची लढाई - शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमण करण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु 28 डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पुर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.
सिद्दी जौहरचे आक्रमण – रुस्तमजमान नंतर सिद्दी स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी महाराज पन्हाळ्यावर होते. सिद्दीने पन्हाळ्याला वेध घातला होता, त्यावेळी सिद्दीची नजर चुकवून महाराज विशालगडावर निघून गेले. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्दी यांमध्ये लढाई झाली. यावेळी बाजीप्रभू मारले गेले व ही लढाई पावनखिंडीची लढाई म्हणून प्रसिद्ध झाली.
शाहिस्तेखानाचा पराभव - औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान दक्षिणेत दाखल झाला. त्यावेळी त्याचा मुक्काम पुण्यातील लाल महालात होता. शिवाजी महाराज यांनी लाल महालात शिरून खानावर वार केले, खान पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र महाराजांचा वार त्याच्या बोटांवर बसला व त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली.
सुरतेची पहिली लुट – गुजरात राज्यातील सुरात त्यावेळी मोगल राज्यात होते. व्यापारामुळे सुरात अतिशय श्रीमंत शहरात गणले जात होते. 1664 साली शिवाजी महाराज सुरतेवर चालून गेले. सलग 4 दिवस महाराजांनी सुरतेची लुट केली. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले.
पुरंदरचा तह – 1665 सालेवे औरंगजेबाने सेनापती मिर्झाराजे जयसिंग याला स्वराज्यावर चालून जाण्यासाठी पाठवले. मात्र इथे शिवाजी महाराज कमी पडले, व लढाईनंतर तह झाला. या तहात स्वराज्यातील 23 किल्ले महाराजांनी औरंगजेबाला दिले, हा तह इतिहासात पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. (हेही वाचा : तब्बल 350 किल्ल्यांचे वैभव प्राप्त करणाऱ्या शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही हा किल्ला)
आग्राहून सुटका – 1666 औरंगजेबाने शिवाजी महाराज यांना आपल्या भेटीसाठी बोलावले. मात्र कपटी औरंगजेबाने त्यांना अटक करून डांबून ठेवले. शेवटी आजारपणाचे नाटक करून शिवाजी महाराज आग्र्यातुन पळून जाण्यात यशस्वी ठरले. यावेळी महाराजांच्यासोबत संभाजीराजे देखील होते.
राज्याभिषेक - 6 जून इ.स. 1674 साली शिवाजी महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक झाला. यावेळी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली.
राज्याभिषेकाच्या नंतर 12 जून 1674 रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. त्यानंतर 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यु झाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)