WHO Warns To Reduce Salt Intake: जास्त मीठ खाणारे व्हा सावध! हृदयविकाराने युरोपात दररोज 10, 000 लोकांचा मृत्यू, डब्ल्यूएचओने दिला इशारा
मीठ कमी खाल्ल्याने आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे हृदयविकारांपासून रक्षण करू शकतो. डॉक्टरांनीदेखील आहारात सोडियमचे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या गरजेवर भर दिला, जे उच्च रक्तदाब, हृदय रोग, मूत्रपिंडाचे आजार अशा आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार आहे.
WHO Warns To Reduce Salt Intake: मीठाशिवाय (Salt) आपल्या जेवणाची चव अपूर्ण असते, मात्र मर्यादेत मिठाचे सेवन हितकारक आहे. मिठाचे अतिसेवन घातक ठरू शकते आणि त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. जगातील बहुतेक लोकसंख्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट मीठ वापरत आहे. यामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. मीठाचे सेवन 25 टक्क्यांनी कमी करण्यासाठी लक्ष्यित धोरणांची अंमलबजावणी केल्यास, 2030 पर्यंत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होणारे अंदाजे 9 दशलक्ष मृत्यू टाळता येतील, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरातील हृदयविकाराच्या वाढत्या धोक्यासंदर्भात एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, युरोपमध्ये दररोज सुमारे 10,000 लोक हृदयविकाराने मृत्युमुखी पडत आहेत, म्हणजे दरवर्षी 4 दशलक्ष मृत्यू. हे मृत्यू युरोपमधील एकूण मृत्यूंपैकी 40 % आहेत.
युरोपमध्ये, मुख्यत्वे जास्त मीठ सेवनामुळे 30 ते 79 वयोगटातील तीनपैकी एक प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. युरोपीयन प्रदेशातील 53 पैकी 51 देशांत, दररोज सरासरी मीठाचे सेवन हे डब्ल्यूएचओने शिफारस केलेल्या दिवसाला 5 ग्रॅम (एक चमचे) पेक्षा जास्त आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न आणि स्नॅक्समध्ये मिठाचा अतिवापर हे होय. इथल्या आहारातील तीन चतुर्थांश सोडियम हे अल्ट्रा-प्रोसेस्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ- जसे की ब्रेड, सॉस, कुकीज, रेडीमेड जेवण, प्रक्रिया केलेले मांस आणि चीजमधून येते.
पहा पोस्ट-
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ‘अत्याधिक मीठ सेवनाने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा मोठा धोका असतो.’ डब्ल्यूएचओ युरोपच्या अहवालानुसार, या भागातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याची शक्यता महिलांपेक्षा 2.5 पट जास्त आहे. पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये पश्चिम युरोपपेक्षा तरुण वयात (30-69 वर्षे) हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता पाचपट जास्त आहे. (हेही वाचा: Tea-Coffee Warning: तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन असाल तर व्हा सावध! ICMR ने जारी केला इशारा, जाणून घ्या सविस्तर)
यावरून हे लक्षात येते की, मिठाचे सेवन कमी करण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मीठ कमी खाल्ल्याने आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे हृदयविकारांपासून रक्षण करू शकतो. डॉक्टरांनीदेखील आहारात सोडियमचे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या गरजेवर भर दिला, जे उच्च रक्तदाब, हृदय रोग, मूत्रपिंडाचे आजार अशा आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)