Toxic Soil Crisis: जगभरातील मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण वाढले; सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, अभ्यासात खुलासा
धातूने दुषित झालेल्या जमिनीमुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे, यासह हे विषारी धातू अन्नपदार्थांद्वारे मानवांपर्यंत पोहोचू शकतात. या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे, दक्षिण युरेशियामध्ये धातूंनी समृद्ध असे एक क्षेत्र सापडले आहे, ज्याबद्दल पूर्वी माहिती नव्हती.
जगभरातील मातीतील विषारी धातूंच्या प्रदूषणाने (Toxic Heavy Metal Pollution in Soils) सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आणले आहे, असा खळबळजनक खुलासा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अहवालात केला आहे. आर्सेनिक, कॅडमियम, कोबाल्ट, क्रोमियम, तांबा, निकेल आणि शिसे यांसारख्या धातूंनी जगातील 14 ते 17 टक्के शेतीयोग्य जमीन (सुमारे 24.2 कोटी हेक्टर) दूषित झाली आहे. हे धातू मानवी आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात. या संकटामुळे अन्नसुरक्षा, मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत.
धातूने दुषित झालेल्या जमिनीमुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे, यासह हे विषारी धातू अन्नपदार्थांद्वारे मानवांपर्यंत पोहोचू शकतात. या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे, दक्षिण युरेशियामध्ये धातूंनी समृद्ध असे एक क्षेत्र सापडले आहे, ज्याबद्दल पूर्वी माहिती नव्हती. या अभ्यासाचे नेतृत्व डेयी होउ (Deyi Hou) यांनी केले असून, त्यांनी 1,493 संशोधनांमधील 7,96,084 मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जागतिक प्रदूषणाचा नकाशा तयार केला.
या अभ्यासानुसार, 90 कोटी ते 140 कोटी लोक उच्च-जोखीम क्षेत्रात राहतात, जिथे मातीतील धातूंचे प्रमाण शेती आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आहे. विशेषतः आर्सेनिक आणि कॅडमियम हे धातू सर्वाधिक धोकादायक असून, ते खाद्य साखळीत प्रवेश करतात आणि कर्करोग, हृदयरोग आणि मज्जासंस्थेचे विकार यांसारखे गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. मातीतील भारी धातूंचे प्रदूषण प्राकृतिक आणि मानवनिर्मित दोन्ही कारणांमुळे होते. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- खडकांचे अपक्षय आणि ज्वालामुखी उद्रेक यांमुळे मातीत नैसर्गिकरित्या धातू जमा होतात. उदाहरणार्थ, आर्सेनिक आणि निकेल हे नैसर्गिक खनिजांमधून मातीत येऊ शकतात.
- खनन, स्मेल्टिंग, आणि धातू प्रक्रिया उद्योगांमुळे शिसे, कॅडमियम आणि तांबा यांसारखे धातू मातीत आणि पाण्यात मिसळतात.
- रासायनिक खते, कीटकनाशके आणि सांडपाण्याचा सिंचनासाठी वापर यामुळे मातीत आर्सेनिक, कॅडमियम आणि झिंक जमा होते. भारतासारख्या देशांमध्ये सांडपाण्याचा वापर शेतीत सामान्य आहे, ज्यामुळे प्रदूषण वाढते.
- जीवाश्म इंधन जाळणे, वाहनांचा धूर, आणि औद्योगिक कचरा यांमुळे शिसे आणि मर्क्युरी मातीत जमा होते. विशेषतः बॅटरी उत्पादन आणि इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योग हे प्रमुख प्रदूषक आहेत.
अशाप्रकारे धातूंची वाढती मागणी हे संकट आणखी गंभीर होत आहे. संकटाचे पर्यावरण, शेती आणि मानवी आरोग्यावर खोलवर परिणाम होत आहेत. जगातील 95% अन्न मातीवर अवलंबून आहे, आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार 2050 पर्यंत 90% माती संसाधने धोक्यात येऊ शकतात. धातू पिकांमधून खाद्य साखळीत प्रवेश करतात, ज्यामुळे भाज्या, धान्य आणि फळे दूषित होतात. (हेही वाचा: Dangerous Heavy Metals in Toothpaste: सावधान! तुमचे टूथपेस्ट असू शकते विषारी; 'या' ब्रँडमध्ये आढळले शिसे आणि पाऱ्यासारखे धोकादायक धातू)
आर्सेनिक आणि कॅडमियम यांसारख्या धातू कर्करोगजन्य असून, मूत्रपिंड, यकृत, आणि त्वचा यांच्याशी संबंधित कर्करोगांचा धोका वाढवतात. शिसे आणि मर्क्युरी मज्जासंस्थेला हानी पोहोचवतात. हृदयरोग, मधुमेह आणि विकासात्मक दोष यांसारखे आजारही या धातूंशी जोडले गेले आहेत. दूषित माती भूजल आणि नद्यांमध्ये धातूंचा प्रसार करते, ज्यामुळे जलचर आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता धोक्यात येते. या संकटावर मात करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपायांची गरज आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)