Stroke Risk: जास्त सोडा, ज्यूस आणि कॉफी प्यायल्याने वाढू शकतो स्ट्रोकचा धोका; संशोधकांनी दिला इशारा

कार्बोनेटेड शीतपेयांचे दीर्घकाळ सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका 22% आणि पॅकेज केलेल्या फळांचा रस प्यायल्याने हा धोका 37% वाढतो.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तुम्हीही घरी किंवा ऑफिसमध्ये बसून दिवसातून तीन-चार कप कॉफीचे (Coffee) सेवन करत असाल तर काळजी घ्या. तुमची ही सवय जीवघेणी ठरू शकते. अलीकडील अभ्यासात, शास्त्रज्ञांच्या एका चमूने लोकांना काही शीतपेयांच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल सावध केले आहे. जे लोक जास्त प्रमाणात कार्बोनेटेड पेये जसे की कोल्ड्रिंक्स किंवा सोडा, पॅक केलेला फळांचा रस किंवा कॉफी घेतात त्यांना स्ट्रोकचा (Stroke) धोका जास्त असतो, असे संशोधकांनी सांगितले. स्ट्रोक हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक मानले जाते.

जर्नल ऑफ स्ट्रोकमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दिवसातून चार कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने स्ट्रोकचा धोका 37% वाढतो. कार्बोनेटेड शीतपेयांचे दीर्घकाळ सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका 22% आणि पॅकेज केलेल्या फळांचा रस प्यायल्याने हा धोका 37% वाढतो. त्यामुळे तुम्हीही या पेयांचे वारंवार सेवन करत असाल तर सावध व्हा.

मॅकमास्टर युनिव्हर्सिटी कॅनडा आणि युनिव्हर्सिटी ऑफ गॅलवे यांनी कॉफी किंवा इतर साखरयुक्त पेयांवर संशोधन केले आहे. या प्रकल्पात 27 देशांतील 27 हजार लोकांचा समावेश होता. यातील 13,500 लोक असे होते ज्यांना पहिल्यांदा पक्षाघाताचा धोका होता. अशा फिजी ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड फ्रूट ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात असे या संशोधनातून समोर आले आहे. हे जास्त प्रमाणात प्यायल्याने साखरेची पातळी वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका देखील लक्षणीय वाढतो. स्त्रिया आणि लठ्ठ किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोकची शक्यता अधिक वाढते. (हेही वाचा: Eggs and Cholesterol: अंड्याचे सेवन केल्याने वाढते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ)

सोडा आणि ज्यूसचे परिणाम जर्नल ऑफ स्ट्रोकमध्ये प्रकाशित झाले आणि चहा आणि कॉफीचे परिणाम इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्ट्रोकमध्ये प्रकाशित झाले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही कॉफी किंवा चहासारख्या गोष्टींकडे पूर्णतः दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र, त्यांचा वापर निश्चितपणे कमी केला जाऊ शकतो. यामध्ये असे म्हटले आहे कि, आपण ग्रीन टी आणि हर्बल टी वापरू शकता कारण ते हानिकारक नाही. आहारात ग्रीन टी आणि ब्लॅक टीचे सेवन केल्यास या आजाराचा धोका 18 ते 20 टक्क्यांनी कमी होतो. दुधाव्यतिरिक्त, तुम्ही इतर पर्याय देखील शोधू शकता. दुधाऐवजी तुम्ही बदाम, सोया किंवा ओट्सपासून बनवलेले फोर्टिफाइड दूध पिऊ शकता.

(टीप- या लेखात दिलेली माहिती इंटरनेट आधारीत आहे. याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)