Stressful Jobs and Low Salary: तणावपूर्ण नोकऱ्या आणि कमी वेतन असलेल्या पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो- Research
त्यामध्ये 3,118 पुरुष आणि 3,347 महिलांचा समावेश होता.
भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. नव्या नोकऱ्या मिळणे अवघड असल्याने लोक आपल्या हातातील नोकऱ्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ते कमी पगारामध्येही काम करण्यास तयार असतात. मात्र धकाधकीच्या, तणावपूर्ण नोकऱ्या (Stressful Jobs) आणि कमी वेतन (Low Salary) असलेल्या पुरुषांना हृदयविकाराचा (Heart Disease) धोका इतरांपेक्षा दुप्पट असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
सर्कुलेशन: कार्डिओव्हस्कुलर क्वालिटी अँड आउटकम्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कामाच्या ठिकाणी असलेल्या मानसिक तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
या अभ्यासाची प्रमुख लेखिका Mathilde Lavigne-Robichaud यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी व्यतीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण वेळेचा विचार करता, कामाचा ताण आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध समजून घेणे कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. नोकरीचा ताण किंवा कमी पगार असलेल्या पुरुषांना हृदयविकाराचा धोका इतर पुरुषांच्या तुलनेत 49 टक्क्यांनी वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
नोकरीचा ताण ही बाब कामाच्या वातावरणाच्या संदर्भात आहे, जिथे कर्मचार्यांना जा काम करावे लागते मात्र त्याबदल्यात त्यांना अपेक्षित मोबदला मिळत नाही. यासाठी 2000 ते 2018 पर्यंत संशोधकांनी सुमारे 6,500 कामगारांचा अभ्यास केला, ज्यांचे सरासरी वय 45 वर्षे होते व ज्यांना हृदयविकार नव्हता. त्यामध्ये 3,118 पुरुष आणि 3,347 महिलांचा समावेश होता. संशोधकांनी प्रश्नावलीच्या निकालांसह नोकरीचा ताण आणि वेतन असंतुलन मोजले. त्यानंतर आरोग्य डेटाबेस वापरून हृदय स्वास्थ्यासंबंधी माहिती प्राप्त केली गेली. (हेही वाचा: Heart Attacks: लहान मुले व तरुण ठरत आहेत हृदयविकाराच्या झटक्याचे बळी; 6 वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, काय आहेत यामागील कारण? जाणून घ्या)
मात्र या अभ्यासामध्ये महिलांचे हृदय स्वास्थ्य आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाचे परिणाम अनिर्णित होते. परिणाम असे सूचित करतात की, कामाच्या वातावरणातील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने केलेले हस्तक्षेप पुरुषांसाठी विशेषतः प्रभावी असू शकतात आणि स्त्रियांसाठी देखील सकारात्मक असू शकतात. हे तणाव नैराश्यासारख्या इतर तणावांशी जोडले गेले आहेत.