COVID 19 होऊन गेलेल्यांनी हृद्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं; तरूणांमधील वाढत्या Cardiac Arrest च्या घटनांवर पहा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला काय?

वयाच्या तिशीपुढच्या व्यक्तींना रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि ईसीजी यांचा समावेश असलेल्या तपासण्या नियमितपणे करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये, विशेषत: तरुण वयोगटांमध्ये कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या (Cardiac Arrest) अर्थात हृदयक्रिया अचानक बंद पडण्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकन हार्ट जर्नलने केलेल्या एका संशोधनानुसार वयाच्या पस्तीशीतील ते पंचेचाळीशीतील व्यक्तींमध्ये कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या घटना अचानक वाढल्या आहेत. एखादी व्यक्ती सणासमारंभांत नाचत असताना, खेळांचे सामने पाहत असताना कार्डिअ‍ॅक अरेस्ट झाल्याच्या, एखादी व्यक्ती व्यायाम करता करता मध्येच कोसळल्याच्या बातम्या आपल्या कानांवर येत आहेत. हे सर्व खूपच भीतीदायक आहे आणि आपल्या हृदयाची आपण विशेषत्वाने काळजी घ्यायला हवी या वस्तुस्थितीची कठोरपणे जाणीव करून देणाऱ्या आहेत. हृदयाच्या आरोग्य आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यांतील दुवे तपासताना जगभरात कोव्हिड-१९ हे या स्थितीला कारणीभूत ठरणारे एक कारण असू शकेल का याचा शोध हृदयरोगतज्ज्ञ आणि संशोधक घेत आहेत.

कोव्हिड-१९ च्या साथीला दोन वर्षे होऊन गेली आहेत तरीही त्यातून उद्भवलेल्या ‘लाँग कोव्हिड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंख्य आरोग्यसमस्यांमधून जग अजूनही सावरते आहे. याची लक्षणे संसर्ग झाल्यावर अनेक आठवडे किंवा महिन्यांनी दिसून येऊ शकतात आणि हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते आणि कोव्हिड-१९ चा संसर्ग कितीही सौम्य किंवा लक्षणरहित असला तरीही हे होऊ शकते. लाँग कोव्हिड असलेल्या व्यक्ती बरेचदा सततचा थकवा, चक्कर आल्यासारखे वाटणे, हृदय वेगाने किंवा जोरजोरात धडधडणे, छातीत दुखणे, धाप लागणे, सांधे किंवा स्नायू दुखणे, ब्रेन फॉग आणि चिंता अशी लक्षणे जाणवत असल्याची तक्रार करताना दिसतात.

कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण कुलकर्णी म्हणतात, “कोव्हिड-१९ ने आपल्या शरीरातील इंद्रिय यंत्रणांवर अनेक प्रकारे परिणाम केला. कोव्हिडनंतर रुग्णांना मल्टि सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS) सारखी समस्या वारंवार जाणवते. यात शरीराच्या वेगवेगळ्या भागांना सूज येते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा रोगप्रतिकार यंत्रणेतील बिघाडामुळे उद्भवणारा ऑटोइम्युन आजार असतो तेव्हा त्यांचे शरीर स्वत:वरच हल्ला करू लागते. रोगप्रतिकारशक्ती नकळत निरोगी पेशींवर हल्ला करू लागते व त्यातून शरीराच्या संसर्गाने बाधित भागाला त्रासदायक सूज येते. बहुतांश लोक १२ आठवड्यांनंतर यातून पूर्णत: बरे होतात आणि त्याहीपूर्वी त्यांना बरे वाटू लागलेले असते. मात्र, काही लोकांमध्ये ही लक्षणे अधिक काळ रेंगाळतात. लाँग कोव्हिडमुळे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन आरोग्यसमस्यांविषयी सध्या कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे याबाबतीत एखादा निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीला सतत छातीत दुखत असेल व त्याबरोबरच मळमळणे, उलट्या, घाम फुटणे किंवा धाप लागणे यांसारखी लक्षणे दिसत असतील तर तिने ताबडतोब वैद्यकीय मदत घेतली पाहिजे.”

डॉ. प्रवीण पुढे म्हणाले, “हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी आणि कार्डिअॅक अटॅक्सना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वेळच्यावेळी प्रतिबंधात्मक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत, कुटुंबातील पूर्वेतिहासामुळे आपल्याला किती धोका आहे याचे मूल्यमापन केले पाहिजे आणि योग्य ती पावले उचलली पाहिजेत. कामाचा कितीही व्याप असला तरीही आपल्या वेळापत्रकात व्यायामाचा समावेश करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आहाराच्या बाबतीत सजग असले पाहिजे, शक्ती मिळवली पाहिजे आणि आपल्या शरीराला उत्साही ठेवण्यासाठी श्वसनाचे व्यायाम व योगासने केली पाहिजेत.”

यामागील प्रत्यक्ष कारणाचा शोध घेण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून एक पाहणी केली जात आहे. यासाठी AIMMS मधील अनेक कार्डिओलॉजिस्ट आणि फोरेन्सिक तज्ज्ञ अचानक झालेल्या कार्डिअॅक अरेस्टच्या सर्वात अलीकडच्या प्रकरणांचे पुनरावलोकन करणार आहेत तसेच मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी मृत व्यक्तीच्या लक्षणांविषयी आणि त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीविषयी माहिती गोळा करणे अर्थात व्हर्बल ऑटोप्सी हाती घेणार आहेत. सध्या उपलब्ध मर्यादित आकडेवारीच्या आधारे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरणाऱ्या लाँग कोव्हिडविषयी निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे हे इथे समजून घ्यायला हवे. पण हृदयाशी संबंधित काही दुखणे असलेल्या किंवा पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असू शकतो.

बॉम्बे हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अनिल शर्मा म्हणाले, “कोव्हिड-१९ होऊन गेलेल्या लोकांनी आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला लान्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनामध्ये देण्यात आला आहे. पूर्वी कधीही कोव्हिड-१९ चा संसर्ग न झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार विकसित होण्याचा धोका ‘लक्षणीय’ असल्याचे दिसून आले आहे. इथे परिणामकारक देखरेख ठेवणे ही कळीची बाब आहे. बरेचदा हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता शोधण्यासाठी हृदयाचे कार्य २४ ते ४८ तासांसाठी नोंदविणाऱ्या होल्टरद्वारे रुग्णावर देखरेख ठेवली जाते. ठोक्यांच्या गतीत एखादा अनपेक्षित बदल किंवा अनियमितता दिसून आल्यास डॉक्टरांकडून शरीरात बसविता येण्याजोग्या कार्डिओव्हर्टर-डीफिब्रिलेटर (ICD) उपकरणाची शिफारस केली जाऊ शकते. हे उपकरण हृदयाच्या ठोक्यावर देखरेख ठेवू शकते व त्यांत सुधारणा घडवून आणू शकते व संभाव्यत: प्राणघातक कार्डिअॅक अर्हिदमिया अर्थात हृदयाचे ठोके अनियमित पडण्याच्या स्थितीमध्ये हृदयाची गती पूर्ववत करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक्स देऊ शकते.”

अलीकडे, वयाच्या तिशीपुढच्या व्यक्तींना रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि ईसीजी यांचा समावेश असलेल्या तपासण्या नियमितपणे करून घेण्याचा सल्ला दिला जातो. लोकांनी जिममध्ये अती श्रम न करण्याची काळजी घेतली पाहिजे कारण त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. त्यांना एखादा आनुषंगिक आजार आहे का याचे मूल्यमापन केले गेले पाहिजे आणि आवश्यकता असल्यास हृदय निरोगी ठेवणारी जीवनशैली कशी सांभाळावी याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now