Mysterious White Lung Syndrome: जगभरात वेगाने पसरत आहे रहस्यमय न्यूमोनियाचा आजार; जाणून घ्या कसा होता 'व्हाईट लंग सिंड्रोम' आजाराचा प्रसार व लक्षणे

एका अभ्यासानुसार, लॉकडाऊन, मास्क घालणे आणि महामारीच्या काळात शाळा बंद केल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यामुळे ते हंगामी संसर्गास अधिक संवेदनशील बनले आहेत.

Virus Repetitional Photo (PC - Pixabay)

White Lung Pneumonia Syndrome: कोरोना विषाणूनंतर चीनला न्यूमोनियाने (Pneumonia) ग्रासल्याचे अनेक अहवाल समोर आले होते. याबाबत भारतामध्येही चिंता व्यक्त केली होती. आता अमेरिकेतील ओहायोमध्ये मोठ्या संख्येने मुलांना रहस्यमय न्यूमोनियाचा त्रास सुरु झाला आहे. यामुळे मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ‘व्हाईट लंग सिंड्रोम’ (Mysterious White Lung Syndrome) नावाच्या जिवाणू न्यूमोनियाच्या नवीन प्रकाराचा उद्रेक चीन, डेन्मार्क, युनायटेड स्टेट्स आणि नेदरलँडमधील मुलांवर परिणाम करत आहे. हा आजार प्रामुख्याने तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांना होतो.

डेन्मार्कमधील मुलांमध्ये रहस्यमय निमोनियाची प्रकरणे 'महामारी पातळी' गाठत आहेत, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसच्या सुरुवातीशी समानता आहे. नेदरलँड्समध्ये देखील न्यूमोनिया असलेल्या मुलांमध्ये चिंताजनक वाढ नोंदवली गेली आहे आणि स्वीडनमध्येही या आजाराचा परिणाम दिसून आला आहे. हा रोग खोकला, शिंकणे, बोलणे, श्वसनाच्या लहान थेंबांद्वारे आणि श्वासोच्छवासाद्वारे प्रसारित होतो.

ओहायो हे एकमेव अमेरिकेचे राज्य आहे जेथे हा चीनसारखा गूढ न्यूमोनिया रोग पसरला आहे. वॉरन काउंटीच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टपासून व्हाईट लंग सिंड्रोम नावाची 142 बाल वैद्यकीय प्रकरणे आढळून आली आहेत. रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या मुलांचे प्रमाण लक्षणीय वाढलेले आहे. वॉरेन काउंटीच्या अधिकाऱ्याने बुधवारी (29 नोव्हेंबर) एका निवेदनात सांगितले की, व्हाईट लंग सिंड्रोम हे ओहायो वैद्यकीय विभागासाठी एक आव्हान बनले आहे. हा रोग चीनमध्ये पसरलेल्या रोगासारखाच आहे.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या एका सूत्राने सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर सध्या सर्व काही सामान्य असले तरी, ओहायोचे अधिकारी ही आजारपणाची लाट कशामुळे उद्भवत आहेत याचा तपास करत आहेत. त्यांच्यामते हा एक नवीन श्वसन रोग नसून, व्हाईट लंग सिंड्रोम हा एकाच वेळी अनेक विषाणूंच्या प्रसारामुळे होतो. (हेही वाचा: Tyrosinemia Type 1, Gaucher’s Disease, Wilson’s Disease, आणि Dravet-Lennox Gastaut Syndrome 4 दुर्मिळ आजारांवर आता औषध स्वदेशी बनावटीची मिळणार; किंमत 100 पटीने खाली)

सरासरी 8 रुग्ण, ज्यापैकी काही 3 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आहे. या आजारात हानिकारक विषाणूंमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो. एका अभ्यासानुसार, लॉकडाऊन, मास्क घालणे आणि महामारीच्या काळात शाळा बंद केल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यामुळे ते हंगामी संसर्गास अधिक संवेदनशील बनले आहेत. वॉरन काउंटीच्या अधिकाऱ्यांनी हात धुणे, खोकताना तोंड झाकणे, आजारी असल्यास घरीच राहणे आणि लसींबाबत अद्ययावत राहण्याची शिफारस केली आहे. ताप, खोकला आणि थकवा, छातीत दुखणे ही आजाराची लक्षणे आहे.