Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूबाबत सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; जाणून घ्या काय आहे हा आजार, त्याची लक्षणे व घ्यावयाची काळजी
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.
Monkeypox: तुम्ही अनेक प्रकारच्या विषाणूंबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक कोविड-19 होता. या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. कोविडमुळे मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच क्रमाने मंकीपॉक्सच्या विषाणूनेही जगात आपले पाय पसरवले आहेत. आतापर्यंत डझनहून अधिक देशांना याचा फटका बसला आहे. या देशांमध्ये मंकीपॉक्सची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतही अलर्ट मोडवर आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी एक बैठक झाली, ज्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळे, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा समावेश आहे. मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.
मंकीपॉक्स म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.
मंकीपॉक्सचा प्रसार कसा होतो?
मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. (हेही वाचा: Mpox Vaccine in India: सीरम इन्स्टिट्यूट स्वदेशी अँटी-एमपॉक्स लस विकसित करण्याबाबत आशावादी; Adar Poonawalla यांची माहिती)
संशयित रुग्णाची लक्षणे–
मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे
सुजलेल्या लसिका ग्रंथी
ताप
डोकेदुखी
अंगदुखी
प्रचंड थकवा
घसा खवखवणे आणि खोकला
मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-
संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.
रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.
हातांची स्वच्छता ठेवणे.
आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)