HIV Cases In Tripura: त्रिपुरामध्ये तब्बल 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह; 47 जणांचा मृत्यू, समोर आले धक्कादायक कारण
या आकडेवारीनुसार राज्यात 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली आहे. त्यापैकी 572 विद्यार्थी अजूनही या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
HIV Cases In Tripura: ‘एचआयव्ही’ (HIV) हा एक धोकादायक आणि संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकता आणि वैज्ञानिक प्रयत्नांमुळे हा आजार आता असाध्य राहिलेला नाही, मात्र या संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे. अलीकडील अहवालांनुसार, त्रिपुरामध्ये (Tripura) या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता आणखी वाढली आहे. त्रिपुरामध्ये आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 47 विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे.
त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) ने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली आहे. त्यापैकी 572 विद्यार्थी अजूनही या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला संबोधित करताना ही आकडेवारी सादर केली.
त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीच्यामते 220 शाळा, 24 महाविद्यालये आणि काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थी इंजेक्शनद्वारे ड्रग्सचे सेवन करतात. संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांचे हे मुख्य कारण मानले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सेंटरच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरामध्ये मे 2024 पर्यंत एचआयव्ही संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 8,729 आहे. यापैकी 5,674 लोक जिवंत असल्याची नोंद आहे, ज्यात 4,570 पुरुष, 1,103 महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये संक्रमित आढळलेली मुले ही श्रीमंत कुटुंबातील आहेत. ड्रग्ज घेणे आणि दूषित सुया वापरल्याने एचआयव्ही संसर्गाचा धोकाही वाढताना दिसत आहे.
या एचआयव्हीच्या आकडेवारीबाबत टीएसएसीएसने सांगितले की, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात दररोज एचआयव्हीचे 5-7 नवीन रुग्ण येत आहेत. या आकडेवारीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे त्रिपुरातील अनेक एचआयव्हीग्रस्त विद्यार्थी देशाच्या विविध राज्यांतील विद्यापीठांमध्ये किंवा मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. (हेही वाचा: HIV Treatment: एचआयव्ही संसर्ग बरा करणारी चाचणी 100 टक्के यशस्वी'; आता फक्त 2 इंजेक्शनने बरा होणार AIDS)
दरम्यान, एचआयव्ही संसर्ग अनेक कारणांमुळे होऊ शकतो, ज्यात असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया किंवा सिरिंजचा वापर किंवा संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमण समाविष्ट आहे. एचआयव्हीमुळे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते की इतर संसर्गजन्य रोगांचा धोका देखील लक्षणीय वाढतो. एचआयव्ही संसर्ग काही महिने किंवा वर्षे टिकून राहिल्यास एड्स होऊ शकतो.