Erection Pills Side Effects: सेक्सदरम्यान पुरुषी शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या Viagra आणि Cialis ठरू शकतात घातक; ब्रिटनमध्ये 200 हून अधिक मृत्यू, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

परंतु त्यामागील पुरुषी शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे सतत सेवन ही बाबदेखील दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Dangerr)

Erection Pills Side Effects: व्हायग्रा (Viagra) आणि सियालिस (Cialis) टॅब्लेट्स ही प्रिस्क्रिप्शनद्वारे प्राप्त होणारी औषधे आहेत, जी पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन (नपुंसकत्व) वर उपचार करण्यासाठी वापरली जातात. मात्र सध्या बाजारात प्रिस्क्रिप्शनशिवायही या गोळ्यांची विक्री होत असल्याने ते घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्यांचे सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. व्हायग्रा आणि सियालिससारखी पुरुष शक्ती वाढवणारी औषधे प्राणघातक ठरू शकतात.

डेली मेलमधील एका बातमीनुसार, युकेमध्ये 1998 पासून आतापर्यंत सुमारे 200 लोकांच्या मृत्यूचा या गोळ्यांशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, या मृत्यूसाठी या गोळ्याच कारणीभूत होत्या का नाही,  हे अद्याप सिद्ध झालेले नाही परंतु अमेरिकेच्या आरोग्य विभागावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थांना हे मृत्यू आणि गोळ्यांमध्ये कनेक्शन आढळून आले आहे.

या गोळ्या परदेशात सहज उपलब्ध असल्याचे अहवालात म्हटले आहे. तुम्ही या ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदी करू शकता. मेडिकल अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटी (MHRA) च्या 2441 पानांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. हा अहवाल पुरुष वर्धित औषध सियालिसशी संबंधित आहे. त्याच वेळी, तज्ञांच्या मते, ही औषधे सुरक्षित आहेत मात्र अशा प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींना हृदयविकाराच्या तक्रारी होत्या. (हेही वाचा: Health Benefits of Sex: लैंगिक संबंधांचे आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून)

डेली मेलच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये मृत्यूचे तात्काळ कारण हृदय किंवा मेंदूशी संबंधित समस्या असल्याचे सांगितले गेले. परंतु त्यामागील पुरुषी शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे सतत सेवन ही बाबदेखील दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. अहवालात असेही म्हटले आहे की, एमएचआरए मृत्यूचे कारण या औषधांशी थेट जोडू शकत नाही, कारण असे झाल्यास ही औषधे देशातून परत मागवावी लागतील किंवा त्यांच्यावर इशारे प्रकाशित करावे लागतील, परिणामी त्यांचा खप कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहवालानुसार, मृतांमध्ये 45 महिलांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश 60 वर्षांचे होते. तसेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्याची 50 प्रकरणे समोर आली आहेत.