Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन

गंगाखेडकर यांनी सांगितले, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र, तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Covid's JN.1 Variant in Maharashtra: राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे (Covid's JN.1 Variant) रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आले असून, या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज झाली.

‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम झालेली नाही तेथे ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्या, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Pakistan Corona Cases: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; सरकारने घेतला Covid-19 चाचण्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय)

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र, तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.  उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. कानिटकर, डॉ. कार्यकर्ते, डॉ. पोतदार, डॉ. कदम यांनी विविध सूचना केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif