कोविडमधून बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यानंतरही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत असल्याने घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करावी

कोविडमधून बरे झाल्यानंतरसुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसून येतात.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविडमधून बरे झाल्यानंतरसुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर थकवा, अपचन, दीर्घकाळ अंगदुखी, स्नायूदुखी, छातीत धडधड होणे, अतिघाम येणे, दोन महिन्यानंतरही तोंडाला चव न येणे, नैराश्य ही लक्षणे दिसून येतात. योग्य आहार आणि नियमित व्यायाम, योग या माध्यमातून पूर्णपणे बरे होता येते. “कोविडमधून बरे झाल्यानंतर पोषण” या पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये डॉ निखिल बांते आणि पोषण आणि आहारतज्ज्ञ इशी खोसला यांनी मार्गदर्शन केले, त्यात ही माहिती दिली.

कोविडमध्ये विषाणू केवळ फुप्फुसावर आघात करत नाहीत तर यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडावरही आघात करतो. त्यामुळे यातून पूर्णपणे बरे होण्यास जास्त कालावधी लागतो असे डॉ निखिल बांते यांनी सांगितले. विषाणूमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रीय (हायपर अ‍ॅक्टीव) होते, ज्यामुळे अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा त्रास जास्त कालावधीसाठी राहतो, असे डॉ बांते म्हणाले.(Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर)

पुढे बोलताना डॉ निखिल बांते यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या अभ्यासातून दिसून येते की, 50 ते 70 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. ही सामान्य बाब आहे. मात्र, यात काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे थ्रोम्बोइम्बोलिझम (thromboembolism) होय. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन रक्ताच्या गाठी निर्माण होतात. रक्तात गाठी निर्माण झाल्यामुळे ह्रदयविकाराची शक्यता असते. मात्र हे प्रमाण कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांपैकी 5 टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांमध्ये आढळते.

फुप्फुसात रक्तगाठीची लक्षणे म्हणजे श्वसनास त्रास होणे, रक्तदाब कमी होतो. अशावेळी रुग्णांनी तातडीने रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ निखिल बांते यांनी दिला. कोविडमधून बरे झाल्यानंतर जर शरीराच्या एका भागात अर्धांगवायू, अशक्तपणा जाणवत असेल तर ही अर्धांगवायूची लक्षणे आहेत, असे डॉ निखिल बांते म्हणाले.

कोविडमधून बरे झाल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांमध्ये (पोस्ट कोविड सिंड्रोम) जास्त काळ कोरडा खोकला राहणे, पल्मोनरी फायब्रोसिस हे दिसून येतात. रुग्ण बरे होताना फुप्फुसावर डाग पडतो, त्यामुळे पल्मोनरी फायब्रोसिसचा त्रास जाणवतो. 90 टक्के रुग्णांना याचा त्रास होत नाही, मात्र 10 टक्के रुग्णांना दीर्घकाळासाठी पूरक ऑक्सिजनची आवश्यकता असते, अशी माहिती डॉ बांते यांनी दिली.

कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना छातीचा त्रास जाणवतो. मात्र, इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 3 टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांमध्ये हा त्रास उद्भवतो. तसेच कोविड उपचारादरम्यान रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे जिवाणू संक्रमण आणि बुरशीजन्य संक्रमण आढळते. बुरशीजन्य संक्रमण केवळ तीव्र मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेले आणि कॅन्सर रुग्णांमध्ये आढळते, असे डॉ निखिल बांते यांनी सांगितले.(कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांना COVID-19 Vaccine एकच डोस पुरेसा; अभ्यासातून खुलासा)

कोविडदरम्यान उपचारात शरीराचा ऱ्हास होतो. त्यामुळे बरे झाल्यानंतर समतोल आणि पोषक आहाराची आवश्यकता आहे. पोषक आहारामुळे शरीराचे डिटॉक्सीफिकेसन होते, अशी माहिती आहार आणि पोषणतज्ज्ञ इशी खोसला यांनी दिली. उपचारादरम्यान शरीराचा ऱ्हास झाल्यामुळे शरीरात दाह निर्माण होतो. त्यामुळे दाह शमन करणारा आहार असावा, असे त्या म्हणाल्या.

आहारात कार्बोहायड्रेटस, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भाज्यांमुळे फायबर मिळते. ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे, त्यांनी एकच वेळ आहार घ्यावा. आहारात प्रथिनांएवढेच स्निग्ध पदार्थांचे महत्त्व आहे. स्निग्ध पदार्थांमध्ये कच्चे नारळाचे तेल, तूप, ओमेगा-3 यास प्राधान्य द्यावे, असे श्रीमती खोसला यांनी सांगितले.

शक्यतो एकवेळच्या जेवणात सलाड आणि कच्च्या भाज्या मोठ्या प्रमाणावर असाव्या. कारण, कोविड उपचारादरम्यान असे दिसून आले आहे की, ज्या रुग्णांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 20 पेक्षा कमी आहे, त्यांना त्रास जाणवला. ज्या रुग्णांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 30 पेक्षा अधिक आहे, त्यांना कसलाही त्रास जाणवला नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘सी’, ‘डी’, जीवनसत्व असलेली फळे, झिंक, बी-कॉम्प्लेकस, मॅग्नेशिअम यांचा वापर असावा. पपई, सुके जर्दाळू, मशरुम यांचा प्रमाणात वापर करावा. तसेच सहज उपलब्ध असलेल्या तुळशी, गुळवेल, आद्रक, लसूण, कडूनिंबाची पाने, आवळ्याचा रस, मध, हळद, अश्वगंधा, काळी मिरी याचा काढा करुन प्यावा, असा सल्ला इशी खोसला यांनी दिला.

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी नियमितपणे मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. तसेच नियमित हलकासा व्यायाम, योग, ध्यानधारणा करावी. मद्य आणि साखरेची मात्रा जास्त असलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे त्यांनी सांगितले.