Covid-19 Eris Variant: मुंबईमध्ये आढळला कोरोना विषाणूच्या 'एरिस' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण; जाणून घ्या लक्षणे व कशी घ्याल काळजी

आता ब्रिटननंतर भारतातील मुंबई शहरात कोरोनाच्या एरिसचे पहिले प्रकरण समोर आले आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले होते. जगभरात कोरोनाचा कहर थांबला असला तरी, मागील काही दिवसांत जगातील विविध देशांमध्ये तिची नवी रूपे समोर येऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार ‘एरिस’ (Covid-19 Eris Variant) आढळला आहे, जो वेगाने पसरत आहे. आता ब्रिटननंतर भारतातील मुंबई शहरात कोरोनाच्या एरिसचे पहिले प्रकरण समोर आले आहे. एरिस प्रकाराचे वैज्ञानिक नाव EG.5.1 आहे आणि त्याची उत्पत्ती ओमिक्रॉनपासून झाली आहे.

बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी TOI ला सांगितले की, मे महिन्यात महाराष्ट्रात नवीन सबवेरियंट आढळून आला होता, त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात कोणतीही बातमी आली नाही. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कोविडच्या सक्रिय प्रकरणांची संख्या जुलैच्या अखेरीस 70 वरून 6 ऑगस्ट रोजी 115 पर्यंत वाढली आणि सोमवारी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 109 वर पोहोचली.

अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 43 आहे, त्यानंतर पुण्यात 34 आणि ठाण्यात 25 आहेत. आकडेवारीनुसार, रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये बदलत्या हवामानामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एरिस संसर्गाची आंतरराष्ट्रीय प्रकरणे देखील वेगाने वाढत आहेत. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) नुसार, कोरोनाव्हायरसची अशी 7 प्रकरणे आढळली आहेत, जी एरिस प्रकाराशी संबंधित आहेत.

एरिस प्रकाराशी संबंधित पाच प्रमुख लक्षणांमध्ये नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा (सौम्य किंवा तीव्र), शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला, वास आणि चव कमी होणे, ताप यांचा समावेश आहे. अभ्यासात असेही दिसून आले की, मुख्य लक्षणे ओमिक्रॉन सारखीच आहेत. प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मूळ कारण अद्याप निश्चित झालेले नाही. (हेही वाचा: जाणून घ्या Disease X म्हणजे काय, ज्याबद्दल असे म्हटले जात आहे की तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरू शकतो)

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, खराब हवामान आणि कमी रोग प्रतिकारशक्तीमुळे या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या नवीन कोविड प्रकारापासून स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य स्वच्छता ठेवावी आणि सामाजिक अंतर राखावे.