Cough Syrup Fails Quality Tests: अलर्ट! देशातील 50 हून अधिक कफ सिरप गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
त्यानुसार, निर्यातीसाठी बनवलेल्या कफ सिरपचे नमूने प्राप्त करून त्यांचे विश्लेषण केले गेले.
सध्याच्या थंडीच्या मोसमात जवळपास प्रत्येक घरात खोकला-सर्दीचा त्रास होतो. अशा परिस्थितीत कफ सिरप (Cough Syrup) पिणे सामान्य आहे. बहुतेक सर्वजण कफ सिरप वापरतात. जर तुम्हीही खोकल्यादरम्यान कफ सिरपचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तर गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाला होता. हे कफ सिरप नोएडाच्या एका कंपनीने बनवल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता. आता कफ सिरपबाबत अशीच एक चिंताजनक नवीन बातमी समोर आली आहे. देशात कफ सिरप बनवणाऱ्या 50 हून अधिक कंपन्या गुणवत्ता चाचणीत नापास झाल्या आहेत.
भारतीय बनावटीच्या कफ सिरपचा जागतिक स्तरावर 141 मुलांच्या मृत्यूशी संबंध जोडणार्या अहवालानंतर, अनेक राज्यांमध्ये केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा हवाला देत सरकारी अहवालामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबरपर्यंत जारी केलेल्या 2,104 चाचणी अहवालांपैकी 54 कंपन्यांचे 128 किंवा 6% अहवाल मानक दर्जाचे नव्हते.
उदाहरणार्थ, गुजरातच्या अन्न आणि औषध प्रयोगशाळेने ऑक्टोबरपर्यंत 385 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 20 उत्पादकांचे 51 नमुने मानक दर्जाचे नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL) मुंबईने 523 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 10 कंपन्यांचे 18 नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले. (हेही वाचा: China Faces Travel Ban: चीनवर प्रवास बंदी घालण्याची तयारी? अमेरिकेत मुलांमध्ये श्वासोच्छवासाचे आजार पसरल्यानंतर करण्यात आली मागणी)
प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL) चंदीगडने 284 चाचणी अहवाल जारी केले आणि 10 कंपन्यांचे 23 नमुने गुणवत्तेमध्ये नापास झाले. इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) गाझियाबादने 502 अहवाल जारी केले, त्यापैकी नऊपैकी 29 कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले होते की, गाम्बियामध्ये सुमारे 70 मुलांचे मृत्यू हे भारतीय उत्पादकाने बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपशी जोडला जाऊ शकतो. तेव्हापासून भारतात बनवलेले कफ सिरप स्कॅनरच्या कक्षेत आले आहे. या वर्षी मे मध्ये, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने राज्य औषध नियंत्रकांना त्यांच्या सरकारी मालकीच्या एनएबीएल-मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना कफ सिरपचे विश्लेषण करण्यासाठी निर्देश देण्यास सांगितले होते. त्यानुसार, निर्यातीसाठी बनवलेल्या कफ सिरपचे नमूने प्राप्त करून त्यांचे विश्लेषण केले गेले.