Coronavirus: मोबाईल, चार्जर याशिवाय आणखी काय हवं सोबत? कोविड-19 तपासणीसाठी जाताना काय काळजी घ्याल?

कोरोना व्हायरस हे संकट आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी पण काळजी करु नये. नागरिक म्हणून तुम्ही गंभीर राहा सरकार म्हणून खंबीर आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या आधीच अनेक वेळा सांगितले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

तुम्हाला जर कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच कोविड 19 (COVID 19) विषाणुची तपासणी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही सरकारी रुग्णालयात जात असाल. खास करुन कोरोना व्हायरस उपचारांवरील रुग्णालयात अथवा तपासणी केंद्रांवर जात असाल. तर, तुम्ही काय खबरदारी घ्याल? कोविड-19 तपासणी करण्यासाठी अथवा या चाचणीसाठी नमुना देण्यासाठी जात असताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच, सोबत येताना काही गोष्टी जरुर आणाव्यात असे अवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी त्याबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच, कोरोना चाचणीसाठी येताना नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, कोणते साहित्य सोबत आणावे याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

मास्क बंधणकारक

तपासणीसाठी संबंधित व्यक्तिच्या घशातील किंवा नाकातील द्रवाचा नमुना घेतला जातो. हा नमुना देण्यासाठी आपण जेव्हा केंद्रावर येता तेव्हा तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे. नमुना स्वीकारण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या केंद्रावर मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ते मास्क वापरण्यात यावेत. मात्र, तोंडाला मास्क न लावता कोणत्याही स्थितीमध्ये या केंद्राजवळ येऊ नये.

मोबाईल, चार्जर आणि इतर आवश्यक साहित्य सोबत हवे

केंद्रावर येताना किमान दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आवश्यक साहित्य सोबत असावे. या साहित्यामध्ये आवश्यक कपडे, अंथरुन, पांघरुन सोबत असावे. आपल्याला जर हृदयविकार, रक्तदाब किंवा मधुमेह अशा प्रकारचा आजार असेल तर या आजारांची आपली औषधं सोबत आणावीत. जी दोन दिवस पुरतील. (हेही वाचा, Lockdown कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा

अणिबाणीच्या वेळी संपर्क करता येईल अशा आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तिचे नाव, फोन नंबर आणि संपर्कासाठी पत्ता सोबत आणावा. आपला मोबाईल जर स्मार्ट मोबाईल असेल तर 'आरोग्य सेतू' हे अॅप डाऊनलोड करावे. मोबाईल आणत असाल तर त्यासोबत चार्जर घेऊन यावे. आपल्या वस्तूंची जबाबदारी ही आपली राहील.

ट्विट

सर्वासामान्य नागरिकांना सर्दी, खोरला, ताप अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव यांनीच केले आहे. कोरोना व्हायरस हे संकट आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी पण काळजी करु नये. नागरिक म्हणून तुम्ही गंभीर राहा सरकार म्हणून खंबीर आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या आधीच अनेक वेळा सांगितले आहे.