Cannabis & Coronavirus: कोरोना व्हायरस रोखण्यासाठी गांजाचा उपयोग केला जाऊ शकतो: अभ्यासातून खुलासा

जगातील अनेक देश याबाबतचा प्रयत्न करीत आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, गांजाचा (Cannabis) वापर घातक असा कोरोना व्हायरस आजार रोखण्यासाठी केला जाऊ शकतो

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूवर सध्या तरी कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. जगातील अनेक देश याबाबतचा प्रयत्न करीत आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, गांजाचा (Cannabis) वापर घातक असा कोरोना व्हायरस आजार रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. वृत्तानुसार, कॅनडाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, लेथब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या एप्रिलमधील अभ्यासात असे म्हटले आहे की, संशोधकांना 13 गांजाच्या वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात सीबीडी (CBD) आढळला आहे.

सीबीडीमुळे कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करण्याच्या मार्गावर, म्हणजेच एसीई 2 (ACE2) मार्गांवर परिणाम होतो. याचाच अर्थ गांजामुळे कोरोना व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते. ऑनलाईन जर्नल प्रीप्रिंट्समध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. ज्याद्वारे हे दर्शविले आहे की, गांजाच्या  वनस्पतीच्या रसामध्ये सर्वाधिक सीबीडी आढळतो, जो कोरोनाला शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रथिने ब्लॉक करण्यास मदत करू शकतो. यूएसडी नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार, सीबीडी म्हणजेच कॅनाबिडिओल सॅटिवा, एक रासायनिक कंपाऊंड आहे जे गांजाच्या वनस्पतीमध्ये आढळते. याचा उपयोग बर्‍याच औषधांमध्ये केला जातो.

(हेही वाचा: कोरोना व्हायरसनंतर भारतामध्ये उद्भवू शकतो कावासाकी सिंड्रोमचा धोका; चेन्नईमध्ये 8 वर्षाच्या मुलामध्ये आढळली लक्षणे)

संशोधकांचे म्हणणे आहे की, गांजा हे विषाणूचे प्रवेश बिंदू 70 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते, संशोधकांनी 800 नवीन कॅनाबिस सॅटिव्ह लाइन आणि ट्रॅक्ट विकसित केले आहेत. या अभ्यासाबाबतच्या संशोधनामध्ये Bo Wang, Anna Kovalchuk, Dongping Li, Yaroslav Ilnytskyy, Igor Kovalchuk, आणि Olga Kovalchuk या संशोधकांचा समावेश आहे. या गटाने असेही सांगितले की, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या गांजा उत्पादनांना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केलेले नाही. त्यामुळे क्लिनिकल चाचणीनंतरच आम्ही त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतो. चाचणी यशस्वी झाल्यास कॅनॅबिडिओल अर्कचा उपयोग माऊथ वॉश, गार्गल करणे, इनहेलंट किंवा जेल कॅप म्हणून करता येईल.