Brain Stroke: भारतामध्ये 'स्ट्रोक' हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण; दर 4 मिनिटांनी होतो एका व्यक्तीचा मृत्यू
ज्या लोकांमध्ये नैराश्येची लक्षणे आहेत त्यांना स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. याशिवाय कोविडचाही स्ट्रोकशी संबंध दिसून आला आहे.
देशात दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) येतो आणि दर चार मिनिटांनी एका व्यक्तीचा स्ट्रोकमुळे मृत्यू होतो. ब्रेन स्ट्रोक हे देशातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. प्राध्यापक डॉ. एम.व्ही. पद्मा श्रीवास्तव, न्यूरोलॉजी विभाग, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्ली, यांनी ही माहिती दिली आहे. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान भारतातील गरीब प्रदेशात स्ट्रोकची काळजी आणि स्ट्रोक संसाधनांची कमतरता या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की, भारतात दरवर्षी ब्रेन स्ट्रोकची सुमारे एक लाख 85 हजार प्रकरणे नोंदवली जातात. हा आकडा दर 40 सेकंदाला एक आहे आणि दर चार मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू होतो.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (GBD) नुसार, भारतात जवळजवळ 70.9 टक्के स्ट्रोकमुळे मृत्यू होतात तर 77.7 स्ट्रोकमुळे अपंगत्व येते. ही आकडेवारी भारतासाठी चिंताजनक आहे, कारण बहुतेक लोक अजूनही अशा प्रणालीखाली जीवन जगत आहे जिथे चांगली (आरोग्य) संसाधने नाहीत. जीबीडी 2010 स्ट्रोक प्रोजेक्टनुसार, 5.2 दशलक्ष (31 टक्के) स्ट्रोक हे 20 वर्षांखालील मुलांमध्ये पाहायला मिळाले आहेत.
अशा परिस्थितीनंतरही, भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत, जिथे या गंभीर परिस्थितींना वेळीच सामोरे जाता येईल. देशातील दुर्गम भागात उपचारासाठी पुरेशा सुविधा नाहीत. देशभरात विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये स्ट्रोक सेवांच्या अनेक बाबींचा अभाव आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी, भारतात जिथे आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी आहेत तिथे टेलीस्ट्रोक मॉडेलचा अवलंब करायला हवा, असा सल्ला पद्मा श्रीवास्तव देतात.
डॉ. श्रीवास्तव म्हणतात, स्ट्रोक घातक असू शकतात किंवा त्यामुळे पक्षाघात होऊ शकतो म्हणूनच शक्य तितक्या लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. स्ट्रोकच्या उपचारासाठी 'गोल्डन विंडो' ही 4.5 तास मानली जाते, त्यानंतरच्या उपचारांमुळे न्यूरॉन्सचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होणार नाही. जेव्हा वेळेवर उपलब्ध होणाऱ्या स्ट्रोक केअर ऍक्सेसचा प्रश्न येतो, तेव्हा भारताला शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येमधील पायाभूत सुविधांच्या अंतराचा सामना करावा लागतो. टेलीमेडिसिनमुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते, असे डॉक्टर सुचवतात. (हेही वाचा: वायु प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ; जगात 1 टक्क्याहून कमी लोक घेत आहेत स्वच्छ हवेत श्वास, अभ्यासात खुलासा)
दरम्यान, न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, नैराश्येचा संबंध स्ट्रोकशी असू शकतो. ज्या लोकांमध्ये नैराश्येची लक्षणे आहेत त्यांना स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. याशिवाय कोविडचाही स्ट्रोकशी संबंध दिसून आला आहे.