Anti-Aging Blood Transfusion: तरुण राहण्यासाठी सीईओ Bryan Johnson ने घेतले मुलाचे रक्त; वर्षाला स्वतःवर खर्च करत आहे 16 कोटी रुपये, जाणून घ्या कशी आहे लाइफस्टाइल (Watch)

यामध्ये त्वचा उपचार अधिक आहेत. चरबी कमी करण्यासाठी, म्हणजे शरीरातील लठ्ठपणा किंवा अतिरिक्त मांस कमी करण्यासाठी तो इंजेक्शन्स घेतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांची टीम वेळोवेळी त्याची काळजी घेते आणि त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवते.

Bryan Johnson (संग्रहित संपादित प्रतिमा)

या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा प्रवास हा कालांतराने वृद्धापकाळाकडे होतो. परंतु आपल्या प्रत्येकाचाच सतत तरुण दिसण्याचा प्रयत्न असतो. ब्रायन जॉन्सनही (Bryan Johnson) याला अपवाद नाही. ब्रायन निसर्गाच्या चक्राविरुद्ध स्वतःला झोकून देत आहे. महत्वाचे म्हणजे यात त्याला यश मिळताना दिसत आहे. आहार, व्यायाम आणि योग्य दिनचर्या या गोष्टी तुम्हाला तरुण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रक्रियेला रिव्हर्स एजिंग (Reverse Aging) म्हणता येईल, ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या आरोग्यदायी गोष्टींद्वारे स्वतःला जास्तीत जास्त काळ तरुण ठेवण्याचा प्रयत्न करता. सध्या ब्रायन जॉन्सन हे ‘रिव्हर्स एजिंग’चे एक मोठे उदाहरण समजले जात आहे.

सध्या रिव्हर्स एजिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि यासाठी ब्रायन जॉन्सनने आपल्या मुलासोबत प्लाझ्मा एक्सचेंजद्वारे स्वतःला 18 वर्षांचा तरुण ठेवण्याचे आव्हान दिले आहे. ब्रायन याचे सध्या वय 45 वर्षे असून, तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो एका बायोटेक कंपनीचा सीईओ आहे. ब्रायनला या वयात 18 वर्षांच्या तरुणासारखे दिसायचे आहे. यासाठी तो दरवर्षी सुमारे 16 कोटी रुपये खर्च करतो.

ब्रायन जॉन्सन पहाटे 5 वाजता उठतो. दिवसभरात तो फक्त 1977 कॅलरीज खातो. जेवढे खातो तेवढे पचवण्यासाठी योग्य तो व्यायाम करतो. त्याच्या अन्नामध्ये कोणत्याही प्रक्रिया केलेल्या घटकाचा वापर केला जात नाही. ऑलिव्हर जौलमन हे ब्रायनचे वैयक्तिक डॉक्टर आहेत. ऑलिव्हरकडे 30 डॉक्टरांची टीम आहे जी ब्रायनची काळजी घेते. ब्रायन सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100 हून अधिक गोळ्या खातो. या औषधांमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि रोगांशी लढण्यासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टींचा समावेश आहे. दिवसभरात तो वेगवेगळ्या प्रकारचे 25 व्यायाम करतो. जॉन्सनचा असा दावा आहे की, या दिनचर्यामुळे त्याने त्याचे जैविक वय किमान 5 वर्षांनी कमी केले आहे.

Anti-Aging Blood Transfusion-

ब्रायन दररोज 5-6 थेरपी घेतो. यामध्ये त्वचा उपचार अधिक आहेत. चरबी कमी करण्यासाठी, म्हणजे शरीरातील लठ्ठपणा किंवा अतिरिक्त मांस कमी करण्यासाठी तो इंजेक्शन्स घेतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांची टीम वेळोवेळी त्याची काळजी घेते आणि त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवते. ब्रायनची नियमित एमआरआय आणि रक्त तपासणी होतो. त्याच्या प्रत्येक अवयवाकडे विशेषरित्या लक्ष दिले जाते. (हेही वाचा: हार्ट अटॅक पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी दुप्पटीपेक्षा अधिक जीवघेणा; 'ही' कारणं आहेत धोक्याची घंटा)

अँटी एजिंग ही एक कठीण प्रक्रिया आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आता ब्रायन जॉन्सनने अजून तरुण दिसण्यासाठी गेल्या महिन्यात डॅलसमध्ये ब्लड एक्सचेंजद्वारे आपल्या मुलाचा प्लाझ्मा घेतला आहे. ही प्रक्रियेबाबत ब्रायनने एका व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे. याला ट्राय जनरेशनल ब्लड स्वॅपिंग ट्रीटमेंट असे नाव देण्यात आले आहे. ब्रायनने याआधीही तरुणांकडून प्लाझ्मा घेतला आहे पण यावेळी त्याने आपल्या मुलाकडून प्लाझ्मा घेतला आहे. आता या रक्त बदलण्याच्या तंत्राची जगभरात चर्चा सुरु आहे. ब्रायनने त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहेत.