मोबाईलवर तासनतास गेम खेळणे पडले महागात, अभिनेत्री शकीला वर 3 लाखांची शस्त्रक्रिया

अभिनेत्री शकीला हिला दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळण्याच्या आणि रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मानेच्या नसांना गंभीर इजा झाली. यावर उपचारासाठी तिला 3 लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया करावी लागली. या अनुभवातून तिने चाहत्यांना मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Actress Shakeela Undergoes Neck Surgery (Photo Credit: YouTube)

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शकीला (Actress Shakeela) यांना मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मानेच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले असून, यावर उपचारासाठी तिला 3 लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया करावी लागली. चेन्नईतील एका रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली असून, सध्या शकिला घरी विश्रांती घेत आहेत. आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत तिने या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. शकीलाने सांगितले की, ती अनेक तास अंथरुणावर एका कुशीवर झोपून मोबाईलवर गेम खेळत असे. एकावेळी सलग सुमारे चार तास खेळ खेळण्यात जायचे. केवळ चहा-कॉफीसाठी उठत असे. चहा घेतल्यानंतर पुन्हा तीच सवय सुरू होती. युट्युब आणि इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्यातही बराच वेळ जात होता. या चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे आणि दीर्घकाळ मोबाईलच्या वापरामुळे तिच्या मानेतील मुख्य नसांवर परिणाम झाला, आणि अखेर तिला शस्त्रक्रिया करावी लागली.

अभिनेत्री शकीला यांच्यावरील शस्त्रक्रिया

डॉ. बालमुरुगन यांनी अभिनेत्री शकीला यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून, यादरम्यान मानेतील समस्येमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी टायटॅनियम स्क्रूचाही वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मानेला आधार देणारा कॉलर घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या तिला अंथरुणातून उठणे, जेवण करणे यांसारख्या दैनंदिन कामांसाठीही इतरांच्या मदतीची गरज लागत आहे.

चाहत्यांना दिला सतर्कतेचा इशारा

आपल्या अनुभवातून धडा घेत शकीलाने चाहत्यांना, विशेषतः पालकांना मुलांच्या मोबाईल वापराबाबत सावध राहण्याचे आवाहन केले. मोबाईल फोन ही उपयुक्त वस्तू असली, तरी गरजेपेक्षा जास्त वापर टाळावा, असे तिने सांगितले. आवश्यक कामांसाठीच फोनचा वापर करावा आणि विनाकारण व्हिडिओ पाहणे टाळावे, असा सल्लाही तिने दिला. दुर्लक्ष केल्यास मोठा आर्थिक भुर्दंड आणि असह्य वेदना सहन कराव्या लागू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

शकीला यांची कारकीर्द

चेन्नईत जन्मलेल्या शकीला यांनी आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडून मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. 1995 च्या तमिळ चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, मात्र 2000 सालच्या मल्याळम चित्रपटामुळे त्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. पुढे केरळमधील पॉप संस्कृतीत त्या एक ओळखीचा चेहरा बनल्या.

डॉक्टरांचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ चुकीच्या स्थितीत बसून किंवा झोपून मोबाईलचा वापर केल्यास मानेच्या आणि पाठीच्या मणक्याच्या तक्रारी वाढू शकतात. सतत एकाच स्थितीत राहणे, स्क्रीनकडे सतत खाली पाहणे यामुळे नसांवर व स्नायूंवर ताण येतो. यामुळे वेळोवेळी विश्रांती घेणे आणि योग्य स्थितीत बसणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement