Friendship Day 2019: राजकीय नेते बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपिनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि त्यांची राजकारणापलीकडील मैत्री

जगभरात हा रविवार फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे काही लोक हा दिवस मैत्रीदिन म्हणूनही साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशीप डे 4 ऑगस्ट 2019 रोजी येत आहे. फ्रेंडशीप डे (Friendship Day 2019) निमित्त जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वेगळा पैलू अधोरेखीत करणाऱ्या राजकारण्यांच्या मैत्रीबद्दल

Balasaheb Thackeray, Sharad Pawar, Vilasrao Deshmukh, Gopinath Munde friendship beyond the politics | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Political Leaders Friendship Beyond The Politics: नातेसंबंधांमधील मैत्रीच्या नात्याला नेहमीच वेगळे वलय मिळाले आहे. कारण व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला मिळणारी नाती ही त्याच्यावर परंपरेने चालत आलेल्या चालीरीतींमुळे स्वीकारलेली असतात. या सर्वात एकच नाते असे असते की त्या व्यक्तीने ते पूर्णपणे स्वच्छेने स्वीकारलेले असते. ते म्हणजे मैत्रीचे नाते. म्हणूनच एकुणच समाजव्यवस्था आणि या सृष्टीमध्ये मेत्री या नात्याचा उच्चार करताच अदृश्यपणे आपल्यासोबत असलेली एक भक्कम ताकद व्यक्त होते. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा या मैत्रीदिनालाच वाहिलेला असतो. जगभरात हा रविवार फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे काही लोक हा दिवस मैत्रीदिन म्हणूनही साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशीप डे 4 ऑगस्ट 2019 रोजी येत आहे. फ्रेंडशीप डे (Friendship Day 2019) निमित्त जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वेगळा पैलू अधोरेखीत करणाऱ्या राजकारण्यांच्या मैत्रीबद्दल.

राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे मित्र नसते आणि शत्रूही नसते. पण, रोजच्या राजकीय जीवनात सतत एकमेकांचे वाभाडे काढणारे हेच नेते जेव्हा आपली व्यक्तीगत मैत्री कायम ठेवतात. तेव्हा तो नक्कीच संस्कृतीचा भाग ठरतो. अशी मैत्रीपूर्ण राजकीय संकृती जपणाऱ्या नेत्यांविषयी.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन नावांना वगळून आपल्याला चालणार नाही. दोघांचेही राजकीय विचार एकमेकांना कधीच पटले नाहीत. त्यांच्यात मतभेद जरुर होते पण, मनभेद कधीच नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी या मैत्रिबद्दल बोलताना एकदा म्हटले होते की, शरदबाबू आणि माझ्यात मतभेत जरुर आहेत. पण, मनभेद कधीच नाहीत. असलाच तर आमच्यात पोटभेद आहे. (बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांना शरदबाबू म्हणत असत.)

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी जाहीर व्यासपीठांवरुन अनेकदा एकमेकांवर चांगलीच शाब्दिक तलवार चालवली आहे. इतकी की, बाळासाहेब हे शरद पवारांन मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या अशी अनेक विशेषणे वापरायची. पण, याच बाळासाहेबांनी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी शरद पवार यांना विनाअट, मोकळ्या मनाने पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर बाळासाहेबांनी त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप सरकारचेही (अटलबिहारी वाजपेयी) मन वळवले आणि सुप्रिया सुळे राज्यसभेवर बिनविरोध निवडणून गेल्या. दोघांच्या मैत्रीबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. मात्र, शब्दसमयसीमा विचारात घेऊन आज त्याबद्दल इतकेच.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे

खरं म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ यांच्यात राजकीय समानतेचा कधी मुद्दाच नव्हता. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाचे लोकप्रिय नेते. गोपीनाथ मुंडे भाजप तर विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे नेते. पण, दोघेही महाविद्यालयीन जीवनापासूनचे एकमेकांचे मित्र. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघेही एकाच दुचाकीवरुन अनेकदा फिरले आहेत. पुढे दोघांनीही राजकीय जीवनात प्रवेश केला. एकमेकांच्या विरोधात टोकाची टीका केली. पण, त्यांच्यातील मैत्री कायम राहिली.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांमध्ये कधीच दुरावा आला नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या प्रसंगी दोघे जर एकाच व्यासपीठावर आले तर दोघांमधील फिरकीची जुगलबंदी पाहाण्यासारखी असायची. आज हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारण आणि या जगाच्या पटलावरुन दूर झाले आहेत. आजकाल राजकारणात अशी मैत्री दुर्मिळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोघांची मैत्री नेहमीच आदर्श म्हणून ओळखली जाईल.

सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख

सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री म्हणजे 'दो हंसों का जोडा' या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध होती. दोघेही कामालीचे हास्यमुद्रेचे नेते. देखणेपण, रुबाबदारपणा आणि अत्यंत टापटीप पेहराव ही दोघांच्याही व्यक्तीमत्वाची ओळख. पण या पलीकडे जाऊन पाहायचे तर दोघेही कमालीचे संवेदनशील आणि तळागाळातून आलेले जनाधार असलेले नेते. दोघेही काँग्रेस विचारात वाढलेले त्यामुळे एकत्रच सत्तासोपाण चढले आणि अनेकदा सत्तेतून एकत्रच पायउतार झाले. काँग्रेस विचारावर जशी त्यांची निष्ठा होती. तशीच निष्ठा त्यांची आपसातील मैत्रीच्या नात्यावरही होती. (हेही वाचा, Friendship Day 2019 HD Images and Wallpapers: फ्रेंड्सशिप डे दिवशी खास HD Images,Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन घट्ट करा तुमचं मैत्रीचं नातं!)

राजकारणात शह-काटशहाचे राजकारण कोणत्याच नेत्याला नवे नसते. राजकारणाचा तो एक भाग असतो. त्यातही दोन्ही नेते एकाच पक्षात असेल तर काहीसा अधिकच. पण, सुशील कुमार शिंदे आणि विलासराव यांच्यात हे राजकारण रंगल्याचे कधी फारसे दिसले नाही. मात्र, विलासराव देशमुख यांनी आयुष्यातून अचानक एक्झीट घेतली आणि हे नाते अधुरे झाले. यात आणखी एक करुण गोष्ट अशी की, विलासराव देशमुख यांच्या निधनाची बातमी सुशीलकुमार शिंदे यांनाच लोकसभा सभागृहात सांगावी लागली. ही बातमी सांगताना सुशिलकुमार शिंदे यांच्या डोळ्यात पाणी होते आणि आवाज कातर झाला होता.