World Book Day 2020: Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक'
अशा आवाज न करता शिकण्याचा हा काळ. कोरोना व्हायरस संकटामुळे सध्या अवघं जग लॉकडाऊन झालं आहे. अशा काळात अशा संवादाची अधिक आवश्यकता. म्हणूनच पुस्तकांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखीत करणारा आजचा हा खास दिवस. जागतिक पुस्तक दिन. म्हणून आजच्या दिनी या खास मित्रा विषयी. जो Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी देतो एक अनुभव. अर्थातच पुस्तक.
जागतिक पुस्तक दिन 2020: असं सांगतात की 'माणसाला आयुष्यात दोनच गोष्टी शिकवतात. एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं'. त्यापैकी माणसांचं म्हणाल तर आपण स्वत:हून त्यांना भेटायला जातो किंवा ते स्वत:हून आपल्याला भेटायला येतात. पुस्तकांच तसं नसतं. पुस्तकांना आपण स्वत:च भेटायला जावं लागतं. माणसांकडून शिकायचं तर त्यांच्याशी बोलावं लागतं. त्याचा आवाज होतो. पुस्तकांशी बोलताना आवाज होत नाही. अशा आवाज न करता शिकण्याचा हा काळ. कोरोना व्हायरस संकटामुळे सध्या अवघं जग लॉकडाऊन झालं आहे. अशा काळात अशा संवादाची अधिक आवश्यकता. म्हणूनच पुस्तकांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखीत करणारा आजचा हा खास दिवस. जागतिक पुस्तक दिन. म्हणून आजच्या दिनी या खास मित्रा विषयी. जो Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी देतो एक अनुभव. अर्थातच पुस्तक.
माणूस लहानाचा मोठा होतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत निरंतर चालणारी ही प्रक्रिया. या प्रक्रियेत माणूस आपला चेहरा दररोज आरशात न्याहाळतो. या न्याहाळण्यात असणारा एक बदल त्याला टीपता येत नाही. हा बदल म्हणजे बदलणारा चेहरा. पण, त्याला ते कधीच जाणवत नाही. कधीतरी केव्हातरी काढलेला भूतकाळातील फोटो समोर येतो आणि प्रश्न पडतो. आरेच्चा! आपण इतके बदललो? पुस्तकांचेही तसेच असते. पुस्तक वाचनाने माणू शाहणा होतो. ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. निरंतर चालणारी. वाचनाने मानवी जीवनात व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर अमुलाग्र बदल होतो. हा बदल व्यक्तिमत्व, विचार, आचार आणि संवाद अशा विविध पातळीवर असतो. हा बदल हळूहळू घडतो. दररोज आरशात आपला चेहरा न्याहाळताना तो बदलत असलेला जसे आपल्याला जाणवत नाही. तसेच पुस्तक वाचनातून होत असलेला बदलही आपल्याला जाणवत नाही. पण तो होत असतो. ही एका रात्रीत पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. (हेही वाचा, World Book Day 2020: शेक्सपियर च्या पुण्यतिथी दिवशी का साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन; जाणून घ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी)
पुस्तक हा माणसाचा निरुपद्रवी मित्र आहे. तो कधीच कोणाला टाळत नाही. स्वत:हून इतरांकडे जात नाही. मानवी मैत्रीत अंतर येणे शक्य आहे. नव्हे ते येतेच. पुस्तक अंतर देत नाही. पुस्तकं निशेध करत नाहीत. मतभेदांवर वाद करत नाहीत. मुळात आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणून ती नामानिराळी राहतात. आपली मतं पुस्तकं इतरांवर लादत नाहीत. पटले तर घ्या. नसेल तर सोडून द्या. इतका शांतपणा आणि संयमीपणा केवळ पुस्तकांमध्येच असू शकतो. म्हणून प्रत्येकाचा पुस्तक नावाचा एक मित्र असवा. जो दररोज प्रत्येकाच्या संपर्कात यावा. जेणेकरुन चेहऱ्याप्रमाणे स्वत: अमुलाग्र बदल होत जाईल. कारण लॉकडाऊन असो की 'एकांत' प्रत्येक वेळी पुस्तक माणसाला नवा अनुभव देते. अनुभुतीसह.