Women’s Day 2023: महिला दिनानिमित्त मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया' येथे विशेष शोचे आयोजन; होणार राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार

पर्यटनमंत्री लोढा म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ दि. 28 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. दि. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Women’s Day 2023: महिला दिनानिमित्त मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया' येथे विशेष शोचे आयोजन; होणार राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार
Women’s Day 2023 (Photo Credit : Pixabay)

राज्याचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे (Women’s Day 2023) औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री लोढा म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ दि. 28 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. दि. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.

या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टीमीडिया लाईट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. (हेही वाचा: Women's Day 2023 Gift Ideas: 5 भेटवस्तू ज्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना देऊ शकता, पाहा)

मंत्री लोढा म्हणाले, मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छता गृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात असून उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2023 11:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).