Guru Nanak Jayanti 2020: गुरु नानक जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवशीचा इतिहास आणि महत्व

यामुळे शीख समुदायदेखील यावर्षी गुरु नानक जयंती आपपल्या घरातच साजरा करणार आहेत.

गुरु नानक जयंती 2019 (Photo Credits: File Image)

Guru Nanak Jayanti Significance: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक यांची जयंती साजरी केली जाते. त्यानुसार, गुरु नानक यांची यावर्षी 30 नोव्हेंबरला 551 वी जयंती साजरी केली जाणार आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे पहिले गुरु आहेत. तसेच शीख धर्माची स्थापना त्यांनीच केली आहे, असेही म्हटले जाते. गुरु नानक यांनी आपल्या कौटुंबिक जीवनातील सुख:ची पर्वा न करता जगभरातील विविध देशात फिरून लोकांच्या मनात वसलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याच्या दृष्टीने कार्य केले. तर, जाणून घेऊया या दिवसाचे इतिहास आणि महत्त्व.

गुरु नानक यांची जयंती यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला यावर्षी रविवारी (29 नोव्हेंबर) मध्यरात्री 12. 47 मिनिटांनी सुरुवात होत आहे. तर, दुसऱ्या दिवशी (30 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजून 59 मिनिटांनी समाप्त होणार आहे. हे देखील वाचा- Tripurari Purnima 2020 Date: त्रिपुरारी पौर्णिमा यंदा कधी? जाणून घ्या कार्तिकी पौर्णिमेचं महत्त्व

इतिहास-

गुरू नानक यांचा जन्म 12 नोव्हेंबर, मंगळवारी झाला. त्यादिवशी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होती. यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरु नानक हे लहानपणापासूनच शांत वृत्तीचे होते. बालपणात डोळे मिटून ध्यान करण्यात ते एकाग्र असायचे. हे पाहून त्याच्या आई-वडिलांनी काळजी करायला सुरुवात केली. एकदा गुरु नानक यांच्या वडिलांनी त्यांना गुरुकुल येथे अभ्यासासाठी पाठविले. तेथे गुरु नानक यांनी आपल्या गुरूंना असे काही प्रश्न विचारले ते ऐकून गुरुकुलमधील सर्वजण अवाक झाले. त्यानंतर देवांनी त्यांना ज्ञान देऊन या पृथ्वीवर पाठवले आहे, असे त्यांचे गुरू बोलू लागले. गुरु नानक यांनी लग्नानंतर काहीच दिवसांत आपले घर सोडून इतर देशांच्या भेटीला गेले. यात प्रमुख भारत, अफगाणिस्तान, पर्शिया आणि अरब यांसारख्या देशाचा समावेश आहे. या देशांत जाऊन त्यांनी तेथील लोकांना उपदेश दिला. दरम्यान, त्यांनी पंजाबमध्ये संत कबीरच्या सद्गुण पूजेचा उपदेश केला. तेव्हापासून गुरु नानक यांना शीखांचे पहिले गुरु म्हणून मानले जाऊ लागले.

महत्व-

या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे. हा दिवस शीख समाजातील लोकांसाठी खूप महत्वाचा आणि खास मानला जातो. गुरु नानक यांना सांसारिक कार्यात रस नव्हता. त्यांनी देवाची भक्ती आणि सत्संग इत्यादींमध्ये जास्त वास्तव्य केले आहे. दरम्यान, देवाप्रती अधिक समर्पण पाहून लोक त्यांना दैवी पुरुष मानू लागले, असेही म्हटले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरे करण्यात आली आहेत. यामुळे शीख समुदायदेखील यावर्षी गुरु नानक यांची जयंती आपपल्या घरातच साजरी करणार आहेत.