Vidyarthi Divas 2020: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो 'विद्यार्थी दिवस'; जाणून घ्या नेमकी काय आहे 'या' दिवसामागील इतिहास

विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या सन्मानार्थ 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

Vidyarthi Divas 2020: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर, 2017 रोजी घेतला. विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या सन्मानार्थ 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानादेखील आंबेडकरांनी स्वतःला जन्मभर विद्यार्थी मानले. तसेच ते एक आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला 'विद्यार्थी दिवस' (Vidyarthi Divas) म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

विद्यार्थी दिवस साजरा करण्यामागील इतिहास -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. या शाळेत बाबासाहेब इ.स. 1904 पर्यंत म्हणजेचं चौथी पर्यंत शिकले. या शाळेत बाबासाहेबांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. तसेच शाळेच्या रजिस्टरमध्ये 1914 क्रमांकासमोर स्वाक्षरीदेखील आहे. त्यामुळे शाळेने हा ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. (हेही वाचा - Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!)

पत्रकार अरुण जावळे हे 2003 पासून शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. अरुण जावळे यांनी या दिनाला 'विद्यार्थी दिवस' म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा दिवस 'विद्यार्थी दिवस' घोषित केला.

दरम्यान, अरुण जावळे यांनी 7 नोव्हेंबर ला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेमधील प्रवेश दिनाला म्हणजेच 7 नोव्हेंबर ला 'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. 2017 मध्ये बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी शासनाने हा दिवस 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.