Shravan Month 2023 in Maharashtra: यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय?

यंदा अधिक मास म्हणून श्रावण महिना आल्याने त्याचा कालावधी वाढला आहे.

Happy Shravan | File Image

Shravan 2023 Dates in Maharashtra: हिंदू धर्मीयांसाठी श्रावण (Shravan Maas) हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना हा एकूण 59 दिवसांचा असणार आहे. यंदा अधिक मास म्हणून श्रावण महिना आल्याने त्याचा कालावधी वाढला आहे. उत्तर भारतामध्ये पौर्णिमेनंतर नव्या महिन्याची सुरूवात केली जात असल्याने सध्या उत्तर भारतामध्ये श्रावण / सावन महिन्याला सुरूवात झाली आहे. पण महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरूवात अजून आठवडाभराने होणार आहे. उत्तर भारतीयांसाठी श्रावण मास हा  4 जुलै ते 31 ऑगस्ट आहे. आज त्यांच्यासाठी पहिला श्रावणी सोमवार आहे.

महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना कधी सुरू होणार?

सोमवती अमावस्येनंतर 18 जुलै पासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. यामध्ये 18 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान अधिक महिन्याचा श्रावण आहे. तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण सुरू होणार आहे. तो 15 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

दरम्यान श्रावणी सोमवारचे व्रत देखील निज श्रावण महिन्यात केले जाणार आहेत. त्यामुळे पहिला व्रताचा श्रावणी सोमवार 21 ऑगस्ट दिवशी आहे तर सांगता 11 सप्टेंबर दिवशी होणार आहे. नक्की वाचा: पवित्र श्रावण महिन्याच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes, Images शेअर करुन साजरा करा श्रावण मासारंभ!

श्रावणी सोमवार तारखा आणि शिवमूठ

श्रावणी सोमवारी व्रत करताना अनेकजण भगवान शंकराच्या देवळात जाऊन शिवमूठ अर्पण करतात. यंदा या शिवमूठा नीज श्रावण महिन्यात ठेवल्या जाणार असल्याने त्याची सुरूवात 21 ऑगस्ट पासून होईल.

21 ऑगस्ट - शिवामूठ - तांदूळ

28 ऑगस्ट - शिवामूठ - तीळ

4 सप्टेंबर - शिवामूठ - मूग

11 सप्टेंबर - शिवामूठ - जव

मराठी कॅलेंडर मध्ये दर 3 वर्षांनी एक महिना हा अधिक मास म्हणून येतो. तर 19 वर्षांनी तोच महिना पुन्हा अधिक मास म्हणून येतो. 2004 नंतर आता यंदा 2023 साली श्रावण महिना हा अधिक मास म्हणून आला आहे.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.)