Shirdi Sai Baba Punyatithi Utsav 2020: साईबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला शिर्डीमध्ये सुरुवात; मंदिरामध्ये फुलांची आकर्षक आरास, भक्तांविनाच संपन्न होणार उत्सव (Watch Video and Photos)

दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त शिर्डीला भेट देतात. साईबाबांच्या पुण्यतीथी सोहळ्याला (Sai Baba Death Anniversary) तर या ठिकाणी विशेष गर्दी होते.

Shirdi Sai Baba Mandir (Photo Credit: Wikimedia Commons )

शिर्डीचे साईबाबा (Shirdi Sai Baba) हे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त शिर्डीला भेट देतात. साईबाबांच्या पुण्यतीथी सोहळ्याला (Sai Baba Death Anniversary) तर या ठिकाणी विशेष गर्दी होते. यंदा बाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. शनिवार, 24 ऑक्टोबर ते सोमवार, 26 ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा होईल. आज साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच, भाविकांशिवाय साजरा करण्यात आला. या उत्सवाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटोंमध्ये दिसत आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरामध्ये फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. मात्र साईबाबा पुण्यतिथीच्या पहिल्या दिवशी मंदिर पूर्ण सुने सुने आहे. आज सकाळी 4 वाजता काकड आरती, पोथी मिरवणुकीने तीन दिवसीय सोहळ्याला सुरुवात झाली. यंदा भक्तांच्याविनाच हा सोहळा पार पडत आहे. साई पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत, त्यामुळे भाविकांना यावेळी बाबांच्या मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे दरवर्षी इथे लाखोंची होणारी गर्दी दिसणार नाही. यंदा साई भक्त फक्त मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच बाबांना नमन करीत आहेत. परंपरेनुसार मंदिरामध्ये पुजाऱ्यांच्या सानिध्यात सर्व विधी होणार आहेत. उद्या या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. दसऱ्याच्याच दिवशी साई बाबांचे महापरिनिर्वाण झाले होते, यंदा या गोष्टीला 102 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे उद्याचे कार्यक्रमही अगदी साध्या पद्धतीने होणार आहे. (हेही वाचा: शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथीनिमत्त WhatsApp Stickers, Facebook Message आणि Greetings पाठवत साजरा करा उत्सव)

दरम्यान, 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी साई बाबा अनंतात विलीन झाले होते. बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की, हा दिवस अनंतामध्ये विलीन होण्यासाठी सर्वोत्तम आहे. याचे संकेत बाबांनी काही वर्षांपूर्वीच दिले होते अशी आख्यायिका आहे.