Pitru Paksha 2020: पितृ पक्षाला यंदा 2 सप्टेंबर पासून सुरूवात; जाणून घ्या पितृपंधरवड्यात काय कराल काय टाळाल?
आहाराबाबतही विशिष्ट नियम पाळले जातात. मग पहा या नेमक्या कोणत्या गोष्टी कराल आणि टाळाल?
हिंदु धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असणार्या पितृपक्षाला (Pitru Paksha) यंदा 2 सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. यंदा भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे सार्याच सण-समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंधनं घालण्यात आली आहेत. यंदा भाद्रपद कृष्णपक्षाच्या पितृपंधरवड्यावर देखील त्याच सावट आहे. त्यामुळे ऐरवी तलावाच्या किंवा पवित्र स्थळी जाऊन पिंडदानाचा होणारा कार्यक्रम यंदा घरगुती स्वरूपातच केला जाणार आहे. मग उद्यापासून सुरू होणार्या या पितृपंधरवड्याच्या काळात जाणून घ्या कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत आणि कोणत्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे. Pitru Paksha 2020 Shradh Dates: पितृपंधरवडा यंदा 2 सप्टेंबर पासून होणार सुरू; पहा सर्वपित्री अमावस्या ते कोणत्या तिथीचं श्राद्ध कधी असेल?
प्रत्येक घरामध्ये पितृपंधरवड्यामध्ये पितरांचे स्मरण करून त्यांचं श्राद्ध घालण्याचे विधी आणि नियम वेगवेगळे असू शकतात. परंतू सर्वसामान्यपणे हिंदू धर्मीय या पंधरवड्यामध्ये शुभ गोष्टी, लग्न, मुंजी, साखरपुडा, घर खरेदी, गृहप्रवेश असे प्रसंग टाळतात. आहाराबाबतही विशिष्ट नियम पाळले जातात. मग पहा या गोष्टी नेमक्या कोणत्या?
पितृपंधरवड्यात कोणत्या गोष्टींबाबत नियम पाळाल?
- पितृपंधरवडा म्हणजे यमलोकातून मृत्यूलोकी पितरांचा येण्याचा काळ, त्यामुळे तुमच्याकडे येणार्या-जाणार्यांना योग्य आदरातिथ्य ठेवा.
- प्राण्यांनादेखील पितृपंधरवड्यात दुखवू नका, इजा पोहचवू नका. त्यांना अन्न दान करा.
- श्राद्धाचं पिंड हे भात आणि तिळाने बनवलेले असते आणि ते कावळ्याचा खायला ठेवलं जातं. अशी समजूत आहे ही कावळा हा यमदेवाचा दूत आहे किंवा पितर कावळ्याच्या रूपाने येतात.
- यंदा कोरोनाच्या काळात सामुहिक ठिकाणी एकत्र येऊन श्राद्ध केलं जाऊ शकत नाही त्यामुळे ब्राम्हणांच्या सल्ल्याने घरच्या घरीच हा कार्यक्रम करा. तेच तुम्हांला योग्य मुहूर्त सुचवू शकतील.
- पितृपंधरवडामध्ये शुभं काम, नव्या वस्तूंची खरेदी टाळा.
- पितृपक्ष सुरू होण्याआधीच श्राद्ध करणार्या व्यक्तीने नखं, दाढी, केस कापावीत.
- गरजू आणि गरीब ब्राम्हण, पुजार्यांना अन्नदान, शिधादान करा.
- मांसाहार, मद्यसेवन, तंबाखू, पान-सुपारी सेवन तसेच काही घरात या काळात कांदा- लसूण युक्त पदार्थ टाळले जातात.
यंदा बाप्पाला निरोप दिल्यानंतर लगेजच दुसर्या दिवसापासून म्हणजे 2 सप्टेंबर पासून पितृपंधरवड्याला सुरूवात होते. 17 सप्टेंबर दिवशी सर्वपित्री अमावस्येला या पितृपक्षाची सांगता होईल. सामान्यपणे व्यक्तीचं ज्या दिवशी निधन झालं त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घालून पितरांप्रती आदरभाव व्यक्त केला जातो.
(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )