Pandav Panchami 2023 Date: यंदा 18 नोव्हेंबर रोजी साजरी होणार 'पांडव पंचमी'; जाणून घ्या काय आहे महत्व आणि आख्यायिका
याच पंचमीला लाभ पंचमी म्हणूनही ओळखले जाते. कोणतीही शुभ कार्ये करण्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो.
Pandav Panchami 2023 Date: दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमी तिथी ‘पांडव पंचमी’ (Pandav Panchami 2023) म्हणून साजरी केली जाते. हा तो दिवस आहे जेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या मदतीने कौरवांचा पराभव केला होता. त्यामुळे तेव्हापासून पाच पांडवांची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली. यंदा शनिवार, 18 नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी साजरी होणार आहे. पंचमीला पांडवांना खास मान दिला जातो. पांडवांसारखे पुत्र मिळावेत यासाठी या दिवशी पांडव आणि कृष्ण यांची पूजा केली जाते. या दिवसाला ज्ञानपंचमी, कडपंचमी, लाभपंचमी, सौभाग्य पंचमी अशा नावांनीही ओळखले जाते.
इतर काही कथांनुसार या पंचमीच्या दिवशी पांडवांचा तेरा वर्षांचा वनवास पूर्ण झाला होता. तर काही ठिकाणी म्हटले आहे की, स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले, तो दिवस कार्तिक शुद्ध पंचमीचा होता; म्हणून त्याला ‘पांडव पंचमी’ म्हणतात. ‘देहाला विराम हा कधी ना कधीतरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात. दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.
या दिवशी लग्न झालेल्या व संतती प्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्या स्त्रिया अंगणामध्ये शेणाचे पाच पांडव बनवून त्यांची मनोभावे पूजा करतात. पांडवांसारखे पुत्र होऊ डे ही या मागील भावना आहे. महाभारतामधील पांडव आणि कौरव यांच्यामधील युद्ध सर्वज्ञात आहे. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडव कौरवांशी लढले होते. अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा करतात, अशी मान्यता आहे. (हेही वाचा: Tulsi Vivah 2023 Date: तुळशी विवाह कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व घ्या जाणून)
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच पंचमीला लाभ पंचमी म्हणूनही ओळखले जाते. कोणतीही शुभ कार्ये करण्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.