Mokshada Ekadashi 2020: 'मोक्षदा एकादशी'चं व्रत केल्याने होते मोक्ष प्राप्ती; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
ही एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाला येते.
Mokshada Ekadashi 2020: हिंदू धर्मात एकादशीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. एका वर्षात 24 एकादशी असतात. परंतु, ज्या वर्षीत अधिमास येतो, त्यावर्षी 26 एकादशी येतात. या वर्षातील शेवटची एकादशी 25 डिसेंबर 2020 रोजी आहे. या एकादशीचे नाव 'मोक्षदा एकादशी' (Mokshada Ekadashi) आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. असं म्हटलं जात की, या दिवशी पूर्ण निष्ठा आणि नियमांचे पालन करून उपवास केला तर, त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. तसेच सर्व पाप नष्ट होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मोक्षदा एकादशी मुहूर्त -
एकादशी प्रारंभ - 24 डिसेंबर, गुरुवार रात्री 11 वाजून 17 मिनिटांनी
एकादशी समाप्ती - 25 डिसेंबर, शुक्रवार रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी
मोक्षदा एकादशीचे महत्त्व -
या एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हटले जाते. ही एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाला येते. धार्मिक मान्यतानुसार, मोक्षदा एकादशी ही अशी एकादशी आहे, जी आपल्या पितरांना मोक्ष देते. महाभारताच्या युद्धाच्यावेळी अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनला त्या मोहातून बाहेर काढले होते. या दिवशी व्रत ठेवणाऱ्यांना लोभ, मोह, द्वेष आणि सगळ्या पापांतून मुक्तता मिळते.
'मोक्षदा एकादशी' पूजाविधी -
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीचे किंवा फोटोचे पुजन करावे. श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला गोड नैवैद्य दाखवा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. तुम्ही या दिवशी फळे खाऊ शकता. या व्रतानंतर अन्नदान करावे.