Kusumagraj Birth Anniversary 2020: ज्येष्ठ साहित्यकार कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेचे महत्व पटवून देणा-या काही निवडक कविता
म्हणूनच त्यांचा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या काही निवडक कविता:
आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून मराठीचे महत्व जगभरापर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ दिवंगत कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून ते कुसुमचे अग्रज असे 'कुसुमाग्रज' (Kusumagraj) नाव त्यांनी धारण केले. अग्रज म्हणजे आधी जन्मलेले असा होता. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान हे खूप महान आणि अनमोल जे शब्दांत मांडता ही येणार नाही. त्यांच्या कित्येक कविता आजही लोकांच्या ओठी ऐकायला मिळतात.
आपल्या कवितांतून त्यांनी मराठीचा आणि मराठी भाषेचा प्रचार खूप उत्तमरित्या केला. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या काही निवडक कविता:
1. माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.
नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.
हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा.
2. माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात ..
तेव्हा हसून सारीजण म्हणलीत
आम्ही शोधलं आमचं मराठीपण …
या भूमीवरील माणसांच्या मनात..
त्यांच्या जखमात ..त्यांच्या रक्तात..
त्यातून उसवतात सूर्याची किरणे….
मराठीपण ओलांडून
साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे…
3. माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे?
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे?
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे?
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे?
ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।