International Tiger Day 2024: वाघांच्या संवर्धनाबाबत आज जगभरात साजरा होत आहे 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन'; भारतामध्ये मात्र गेल्या पाच वर्षांत तब्बल 628 प्राण्यांचा मृत्यू

या प्रकल्पांतर्गत अनेक व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले. वाघांची शिकार थांबवून त्यांची संख्या वाढवण्याचे काम करता यावे यासाठी अनेक प्रकारची धोरणे आखण्यात आली.

Tiger Representational image (PC - Pixabay)

दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’ (International Tiger Day) 2024:साजरा केला जातो. वाघांच्या घटत्या संख्येची कारणे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आपली परिसंस्था निरोगी ठेवण्यात आणि तिची विविधता टिकवून ठेवण्यात वाघ महत्त्वाची भूमिका बजावतात. आजचा हा दिवस वाघांची शिकार, त्यांचा अधिवास नष्ट होणे, मानव-वाघ संघर्ष आणि अवैध वन्यजीव व्यापार यासारख्या धोक्यांपासून वाघांना वाचवण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गेल्या पाच वर्षांत भारतात तब्बल 628 वाघांचा मृत्यू झाला आहे.

याच काळात वाघांच्या हल्ल्यात 349 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) नुसार, 2019 मध्ये 96 वाघ, 2020 मध्ये 106, 2021 मध्ये 127, 2022 मध्ये 121 आणि 2023 मध्ये 178 वाघांचा मृत्यू झाला. या जंगली मांजरींचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे आणि शिकारीसह इतर कारणांमुळे झाला.

तर, 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट दरम्यान हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह (GTI) द्वारे करण्यात आले होते. या परिषदेत जगभरातील सुमारे 13 देश सहभागी झाले होते. व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेताना या सर्व देशांनी वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर आतापर्यंत इतर अनेक देशांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

पर्यावरणाची हानी, हवामान बदल आणि अवैध शिकार याशिवाय इतर अनेक कारणांमुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. म्हणूनच वाघांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच त्यांचे संरक्षण आणि अधिवास कसा वाढवता येईल यावर उपाययोजना करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. आजच्या दिवशी, ही अनोखी लुप्तप्राय प्रजाती नामशेष होणार नाही याची काळजी घेण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. (हेही वाचा: UNESCO World Heritage Site: आसामच्या Charaideo Maidam चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश; भारतामधील 43 वे स्थळ)

वाघांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला. या प्रकल्पांतर्गत अनेक व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले. वाघांची शिकार थांबवून त्यांची संख्या वाढवण्याचे काम करता यावे यासाठी अनेक प्रकारची धोरणे आखण्यात आली. त्यामुळे भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प सुरु आहेत. मात्र तरीही गेल्या पाच वर्षांत भारतामध्ये 600 हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. 2012 च्या तुलनेत 2023 मध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात वाघांची संख्या 3,682 होती, जी जागतिक वाघांच्या लोकसंख्येच्या सुमारे 75 टक्के आहे. भारतामध्ये 785 वाघांसह मध्य प्रदेश हे सर्वाधिक वाघ असलेले राज्य आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif