Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ

यंदा 14 सप्टेंबर रोजी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असून, खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याबाबत तिथी, पूजेच्या योग्य वेळा यांची सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी कराल? हरतालिका व्रत कधी सोडाल?

Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ
Ganesh Chaturthi Puja Timings | Wikipedia

Ganpati Pran Pratishtha Muhurat 2026: यंदाची गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाप्पाचं आगमन चैतन्यमय वातावरणामध्ये करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. 14 सप्टेंबरला यंदा बाप्पा सर्वत्र विराजमान होणार आहेत. पण यंदा हरतालिका (Hartalika) आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने बाप्पाचे पूजा विधी, हरतालिकेचा उपवास या दोघांची सांगड कशी घालायची? हा प्रश्न तुम्हांलाही सतावत असेल तर जाणून घ्या यामधून मार्ग कसा काढाल? हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी येण्याच्या या दुर्मीळ योगाबाबत सविस्तर घ्या जाणून!

हरतालिका आणि गणेश चतुर्थी तिथींचा योग कसा जुळून आला?

सोमवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपून भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होते. सूर्योदयाच्या वेळी भाद्रपद शुक्ल तृतीया असल्याने त्याच दिवशी हरतालिका पूजन करायचे आहे. तसेच मध्यान्हकाळी भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि पूजनही त्याच दिवशी करायचे आहे. त्यामुळे यंदा हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.

खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सन 2000, 2006 आणि 2009 मध्ये हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर असा योग 2032 मध्ये पुन्हा येणार आहे. नक्की वाचा: Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणपतीत प्रियजणांना घरी बोलावण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'आमंत्रण पत्रिका' 

यंदा हरतालिका उपवास आणि श्रीगणेश चतुर्थी कशी साजरी करायची?

हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते स्वतंत्र असल्याने, कोणतीही पूजा आधी किंवा नंतर केली तरी चालते, असे सोमण यांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपत असली, तरी त्या दिवशी हरतालिका पूजा सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत, म्हणजे दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत केली तरी चालणार आहे.

हरतालिकेचा उपवास मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी सोडायचा आहे. कोणी ऋषिपंचमीचा उपवासही करत असेल, तर अन्नाचा वास घेऊन हरतालिकेचा उपवास सोडता येतो आणि ऋषिपंचमीचा उपवास पुढे सुरू ठेवता येतो, असेही सोमण यांनी नमूद केले.

गणेश चतुर्थी 2026 ला गणेशमूर्ती स्थापनेची योग्य वेळ काय?.

सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी मध्यान्हकाळी भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि षोडशोपचार पूजन सकाळी 11 वाजून 21 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटे या मध्यान्हकाळात करायचे आहे.

ही वेळ शक्य नसल्यास, पहाटे उष:कालापासून ते मध्यान्हकाळ संपेपर्यंत, म्हणजे दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि पूजन करता येईल, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2026 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).